चंद्रपूर : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील २६ हजार मजुरांची मागील तीन महिन्यांपासूनची सुमारे तीन कोटी ४६ लाख रुपयांची मजुरी थकीत आहे. ऐन सण-उत्सवात मजुरी थकीत असल्याने मजुरांपुढे मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.
दुष्काळातील मनुष्यबळ हाताळणीची एक उपाययोजना म्हणून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार ‘मागेल त्याला रोजगार’ उपलब्ध करून दिल्या जातो. रोहयोतून घरकुल, शौचालय, विहीर, खोदाई, गोठा बांधकाम या वैयक्तिक लाभाच्या कामासह सामूहिक शेततळे, मत्स्यतळे, शाळेसाठी संरक्षक भिंत, मैदानासाठी साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन, कॉंक्रीट नाला बांधकाम, शालेय स्वयंपाकघर आदी कामे जॉबकार्ड असलेल्या कामगारांमार्फत केली जातात. कामे केल्यानंतर हप्त्याभरात मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा करण्याची तरतूद आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २६ हजार मजुरांची तीन कोटी ४६ लाख रुपये मजुरी शासनाकडे थकीत आहे. मजुरी मिळत नसल्याने महागाईच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना मजुरांना करावा लागत आहे.
रोहयोंतर्गत काम केल्यानंतर हप्त्याभरात मजुरी देण्याची शासनाची तरतूद आहे. मात्र जिल्ह्यातील सुमारे २६ हजार मजुरांचे मागील तीन महिन्यांचे तीन कोटी ४६ लाख रुपये शासनाकडे थकीत आहे. परिणामी मजुरांना वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मजुरांची थकीत मजुरी त्वरित देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे.
-विजय कोरेवार, माजी सभापती, पंचायत समिती सावली
केवळ मार्च महिन्यांची जिल्ह्यातील मजुरांची मजुरी आयुक्त कार्यालयातूनच निधीअभावी थकीत आहे. त्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. निधी आल्यानंतर लगेच मजुरांची मजुरी देण्यात येणार आहे.
-प्रीती दुधलकर, उपजिल्हाधिकारी, रोहयो