लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रमाई, शबरी व मोदी आवास योजनेंतर्गत २०१६ ते २०२४ या कालावधीत जिल्ह्यात २६ हजार ३५७ घरकुलांची कामे अर्धवट रखडली आहेत. अपूर्ण राहिलेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी १ ते ३१ मे दरम्यान विशेष मोहीम सुरू करावी. कोणत्याही परिस्थिती ३१ मेपर्यंत पूर्ण करावे, असा अल्टिमेटम जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे.
गृहनिर्माण अभियंता, स्थापत्य अभियंता, तालुका स्तरावर गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशा जवळपास १०० हून जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी पूर्ण करण्याचेही आदेशात नमूद केले. अर्धवट घरकुलांची संख्या अधिक असल्याने बांधकाम पूर्ण करण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या यापूर्वी खाते प्रमुखांनी ग्रामपंचायतींना भेट देऊन घरकुलांच्या बांधकामाची पाहणी केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी अॅक्शन प्लान तयार करण्यात आला आहे.
ग्रामीण विकासने केले नियोजनअर्धवट घरकुलांची कामे मार्गी लावण्यासाठी जि. प. ने लक्ष केंद्रित केले. याबाबत सूक्ष्म नियोजन करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम सुरू करण्यात येईल. जिल्ह्यात अर्धवट घरकुलांची संख्या पाहता खाते प्रमुखांकडून ग्रामपंचायतींना भेटी देण्यात आल्या. या मोहिमेद्वारे जास्तीत जास्त घरकुलांच्या कामांना गती येईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नमूद केले आहे.