वढोली : तालुक्यातील तारडा गावातून एका मोठ्या पुलाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या दोन्ही तालुक्याच्या सीमेवरून अंधारी नदी वाहत असून, या नदीवर फार मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे. सदर कामासाठी दोन ते तीन यांत्रिक मशीनद्वारे चक्क नदीपात्रालाच उपसून त्यातून दिवसाढवळ्या रेती चोरण्याचा सपाटा सुरू आहे. या माध्यमातून आतापर्यंत शेकडो ब्रास रेती पुलाच्या साईडवर टाकल्या गेली आहे. तर मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे नदीपात्रात उत्खनन करून वाहतुकीसाठी ठेवल्याचे दिसून येत आहे.
पुलाच्या बांधकामाकरिता कंत्राटदाराने चक्क नदीपात्रातीलच अवैध रेती चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्याला जोडणारा राज्यमार्ग तालुक्यातील तारडा गावापासून जात आहे. सदर काम संथगतीने चालले आहे. तारडा गावालगत अंधारी नदी वाहत असून, या नदीवर एका मोठा पुलाचे बांधकाम चंद्रपुरातील एका ठेकेदारामार्फत सुरू आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे दहा हजार ब्रास रेतीची आवश्यकता राहणार असल्याचे बोलल्या जात असून, ही गरज पूर्ण करण्यासाठी सदर ठेकेदाराने चक्क नदीवरच हल्ला चढविला आहे. त्यांनी नदीकाठावर आपला डेरा मांडला असून, दिवसाढवळ्या एक दोन नव्हे तर चक्क तीन यांत्रिक मशीनच्या माध्यमातून नदीपात्राला उपसण्याचा पराक्रम चालविला आहे. हा प्रकार मागील तीन ते चार दिवसापासून चालला असताना अजूनपर्यंत याची काहीएक कल्पना तालुका प्रशासनाला नसेल तर नवलच. यांत्रिक मशीनच्या माध्यमातून जवळपास अर्धे पात्र त्यांनी आताच खोदून काढले आहे. पुन्हा याच पात्रातून रेती उत्खनन सुरू असून पात्रात मोठमोठी खड्डे पडले आहेत. दरम्यान, बांधकाम व्यवसायिकाशी संबंधित व्यक्तीला याबाबत विचारणा केली असता त्यांनी नदीपात्रातूनच पुलाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्यामुळे आम्ही रेतीचा उपसा केला. हा प्रकार आमच्या कामकाजाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराकडे आता बांधकाम विभागाने व महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.