कोरपना : शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोन घरातून चोरी व एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
येथील गिरडकर लेआउटमधील कृषी व्यापारी पुंडलिक गिरसावळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या घरातील कुलूप तोडून कपाटातील दोन झुमके अंदाजे सात ग्रॅम वजन किंमत २१,००० हजार रुपये, सोन्याचे लहान मुलांचे गोप २ ग्रॅम, सहा हजार रुपये, नाकातील सोन्याची नथ १ ग्रॅम, तीन हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले. यात संपूर्ण ३० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. वार्ड क्रं १ मधील कडधान्य व्यापारी भानुदास राजूरकर यांच्या निवासस्थानासमोर ठेवून असलेली (एम एच ३४, ए टी ७६६४) फॅशन प्रो दुचाकी (अंदाजे किंमत ३० हजार रुपये) चोरट्यांनी पळविली. मेन रोड वरील दिलीप खिरटकर यांच्या निवासस्थानी कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. मात्र, तेथे कुठलीही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने एकही वस्तू चोरी गेली नाही. या घटनांमुळे कोरपना शहरात एकच खळबळ उडाली. याची माहिती घरमालकांकडून मिळताच कोरपना पोलिसांनी चारही ठिकाणी जाऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.