चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गावांमधील शाळा सुरु करता येतील का, यासंबंधीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त असलेल्या गावांमध्ये शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तिसऱ्या लाटेचाही धोका कायम आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ८४ हजार ६६४ जणांना कोरोना बाधा झाली आहे. यातील ८२ हजार ९०८जण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत २२९
कोरोना बाधित उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. जर येत्या काही दिवसामध्ये कोरोनामुक्त जिल्हा झाल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये १८३६ गावे आहेत. दरम्यान, दुसऱ्या लाटेमध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातही कोरोरा रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अजूनही धास्तावलेले आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे.
कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहे. मध्यंतरी कोरोना शिथिल झाला असताना नववी, दहावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. तर २७ जानेवारीपासून पाचव्या वर्गापासून शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेताच वर्गोन्नत करण्यात आले. आता २८ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. मात्र कोरोना संकटामुळे शाळेत केवळ शिक्षक जात आहेत. त्यातच डेल्टाचा धोका असल्यामुळे राज्य शासनाने पुन्हा निर्बंध घातले आहे. अशावेळी शाळा सुरु होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त गावांचा आढावा घेण्याबाबतच्या सूचना केल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरु होतील, अशा आशा व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील जि.प.शाळा -१५५७
अनुदानित शाळा- ३७५
विना अनुदानित शाळा-३९१
महापालिका शाळा -५९
समाजकल्याण शाळा-५६
बाॅक्स
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पाचवी-३२८४५
सहावी-३२२५७
सातवी-३३१६१
आठवी-३३४४१
बाॅ्क्स
जिल्ह्यातील एकूण गावे-१८३६
सध्या कोरोनामुक्त असलेली गावे-
कोट
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावात शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. मात्र तिसरी लाट तसेच डेल्टाचा धोका असल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच शाळा सुरू कराव्यात. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे सध्यातरी गरजेचे आहे.
-पारस पिंपळकर
सरपंच संघटना,