चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी १६ जुलैला आदेश काढल्याने चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेत. प्रदूषणाने ग्रासलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांच्या उपचाराची सोय आणि वैद्यकीय शिक्षणातील पोकळीही भरून निघणार आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालयाबाबत परवानगी पत्र जारी केल्यानंतर चंद्रपूरकरांमध्ये आनंदाची लाट पसरली. विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला धन्यवाद दिले. येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य जे.ए.शेख म्हणाले, चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी ज्या-ज्या पक्ष व सामाजिक संघटनांनी विविध मार्गाने पाठपुरावा केला, त्यांच्या लढ्याचे हे यश आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनासह या सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे. चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय शिक्षणात मागे पडला होता. आता वैद्यकीय महाविद्यालय होत असल्याने ही पोकळीदेखील भरून निघणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे म्हणाले, सर्व राजकीय, अराजकीय संघटनांच्या लढ्यानंतर चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालाचे स्वप्न साकार झाले आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार असून दरवर्षी ७० डॉक्टर तयार होतील. याचा केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर विदर्भालाही फायदा होईल.ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे म्हणाले, चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय देण्याची मागणी जुनी आहे. पर्यावरण प्रेमींकडून ही मागणी रेटल्या गेली. चंद्रपूर जिल्हा हा औद्यागिक जिल्हा असल्याने या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. त्यात अपघाताच्या घटनाही घडत असतात. मात्र येथे गंभीर रुग्णांवर उपचाराची सोय नाही. आदिवासीबहुल गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी थेट नागपूरला जावे लागते. मात्र येथे वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याने उपाचाराचा मार्गही सुकर होणार आहे. विज्ञान शाखेची विद्यार्थीनी स्नेहा काकडे म्हणाली, वैद्यकीय क्षेत्र निवडायचे आहे, असा विचार पालकांजवळ बोलून दाखविल्यास आपल्या जिल्ह्या किंवा जवळच्या ठिकाणावर महाविद्यालय उपलब्ध नसल्याने त्या क्षेत्राकडे वळायचेच नाही, असा पालकांचा आग्रह असे. मात्र चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आम्हाला आता वैद्यकीय क्षेत्राचीही निवड करता येणार आहे. विज्ञान शाखेची श्वेता जोगी म्हणाली, एरवी चंद्रपुरात मेडिकल कॉलेज नसल्याने इच्छा असूनही वैद्यकीय क्षेत्राकडे वळता येत नव्हेत. मात्र आता वैद्यकीय शिक्षण हेच माझे ध्येय असणार आहे. विज्ञान शाखेचा विद्यार्थी पवन राठोड म्हणाला, चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय होणार की नाही, याबाबत सांशकता होती. मात्र शासनाच्या निर्णयामुळे या सांशकतेला पूर्णविराम मिळाला आहे. छगन निवलकर म्हणाला, चंद्रपूर अनेक विद्यार्थ्यांना चंद्रपूर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने अन्य जिल्ह्यात शिक्षणासाठी जावे लागत होते. आता चंद्रपुरातच वैद्यकीय महाविद्यालय होत असल्याने ही समस्या सुटली आहे.आॅल इंडिया मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन गाडगे म्हणाले, चंद्रपुरात मजुरीवर जगणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणे त्यांना शक्य होत नाही. होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालय अशा गरीब घटकांसाठी वरदानच ठरणार आहे. (प्रतिनिधी)महाविद्यालय उत्तमपणे चालावे हे पुढचे ध्येय : ना. मुनगंटीवारचंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेल्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’जवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आपण मंत्री या नात्याने पूर्ण प्रयत्न केले. तीन दिवसांपूर्वीच मुंबईत या विषयावर बैठक लावून आढावा घेतला होता. पंतप्रधानांकडेही चंद्रपर आणि गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल यापूर्वी स्वत: पत्रव्यवहार केलेला होता. या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी चांगली सुरूवात झाली आहे. हे महाविद्यालय उत्तमपणे चालावे, ते आदर्श महाविद्यालय ठरावे आणि नागरिकांना आरोग्यसेवेसोबतच वैद्यकीय शिक्षणक्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण येथून मिळावे, यावर आपला भर राहणार आहे, असेही ते म्हणाले.न्यायपालिकेच्या निर्णयामुळे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासह येथील युवकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे आपण समाधानी आहोेत. चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी आपण आधीपासूनच प्रयत्नरत होतो. शासन दरबारी मांडलेली ही मागणी दुर्लक्षित झाल्याने न्यायालयाकडे दाद मागावी लागली होती. न्यायालयानेही सामाजिक आणि मानवतेच्या भावनेतून विचार करून चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न निकाली काढला आहे. यामुळे चालू सत्रातच हे महाविद्यालय सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक दृष्ट्याही हा निर्णय अभिनंदनिय आहे. हे महाविद्यालय सक्षमपणे चालावे, यासाठी आपण प्रयत्नरत राहू. - नरेश पुगलिया, माजी खासदार
वैद्यकीय महाविद्यालयामुळे उपचाराची सोय
By admin | Published: July 17, 2015 12:48 AM