जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : पुरेशी रक्कम उपलब्ध राहणारचंद्रपूर : काळा पैसा आणि बनावट चलणी नोटांवर प्रतिबंध घालण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा बाद करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून पुरेशा प्रमाणात शंभरच्या नोटा बँकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. बँकामध्ये जुन्या नोटा बदलून दिल्या जात असून एटीएमवरही उद्यापासून पैसे काढता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एकाचवेळी बँक किंवा एटीएममध्ये गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.नागरिकांना सध्या एका दिवशी चार हजाराच्या नोटा बदलून नवीन नोटा दिल्या जात आहे. शुक्रवारपासून एटीएमवरूनही पैसे काढता येणार आहे. बँका आणि एटीएमवरून व्यवहारासाठी पुरेशा प्रमाणात शंभरच्या नोटा उपलब्ध आहेत. त्यामुळे बँकामधून नोटा बदलण्यासोबतच एटीएमवरही पैसे उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी एकाचवेळी गर्दी केल्यास व्यवहारात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसात गर्दी कमी झाल्यानंतरही सहज पैसे उपलब्ध होवू शकतील. त्यामुळे आवश्यकता नसल्यास किंवा पुरेशे सुटे पैसे जवळ असल्यास नागरिकांनी बँक किंवा एटीएमवर जावू नये. ज्यांना आवश्यकता आहे, अशाच व्यक्तींनी पैसे काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पेट्रोल पंप आणि औषधी दुकानांमध्ये ११ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जात आहे. यामुळे या ठिकाणी वाढलेली गर्दी लक्षात घेता सुटे असल्यास सुटे पैसे द्यावे. दहा, वीस अशा रुपयांची औषधी खरेदी करायची असल्यास नेमके सुटे पैसे द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शंभरच्या नोटा उपलब्ध, एटीएमवर गर्दी करू नये
By admin | Published: November 11, 2016 12:58 AM