बल्लारपुरात चर्चासत्र : अक्षयकुमार काळे यांचे प्रतिपादनबल्लारपूर : आदिवासी साहित्यकारांनी वैश्विक साहित्य निर्मितीकडे झेप घेऊन आपल्या व्यक्तिगत अनुभवांना व्यापक रूप द्यावे. लेखन विज्ञाननिष्ट असावे. त्यात समाजाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. साहित्याचा प्रकार कोणताही असो. त्यात मानवीमूल्यांचा उद्घोष असावा, असे प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी येथे केले.स्थानिक भालेराव पब्लिक स्कूलच्या प्रांगणात साहित्य अकादमी आणि आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्था बल्लारपूर यांचे संयुक्त विद्यमान ‘आदिवासी साहित्याचे विविध आयाम’, या विषयावर शनिवारपासून दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन केल्यावर डॉ. काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. विनायक तुमराम होते. याप्रसंगी मंचावर आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्थेचे सल्लागार सुनील कुमरे व संस्थेचे अध्यक्ष संतोष आत्राम उपस्थित होते.साहित्य अकादमी विषयी माहिती देताना डॉ. काळे म्हणाले, अकादमीद्वारा विविध भारतीय ग्रंथांचे भारतीय भाषांमध्ये भाषांंतर करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. साहित्य जतन करणे व त्याला चालना देणे हे या संस्थेचे काम असून आजचे हे चर्चासत्र त्याचाच एक भाग आहे. नागर संस्कृतीच्या लेखकांनी आदिवासींबाबत त्यांच्या समस्यांबाबत लिहावे, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. विनायक तुमराम म्हणाले की, लेखनात बोलघेवडेपणा नसावा. त्यात धार हवी. साहित्य समाजाच्या दूर जाणारे नसावे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनात आदिवासी लेखकांना निमंत्रित केले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आदिवासी हे वनवासी नाहीत तर ते राज्यकर्ते आहेत. त्यांनी या भागात ८०० वर्षे राज्य केले आहे, हे विसरू नये, असे इतिहासाचा दाखला डॉ. तुमराम यांनी दिला.प्रास्ताविक व संचालन सुनील कुमरे व कृष्णा किम्बहुने तर आभार प्रदर्शन संतोष आत्राम यांनी केले. यावेळी डॉ. काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जागतिकीकरण आणि आदिवासींचा निसर्ग धर्म’, ‘आदिवासी साहित्य नवे संदर्भ व नवे आकलन’, या दोन विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
मानवीमूल्यांचा उद्घोष करणारे साहित्य हवे
By admin | Published: February 12, 2017 12:37 AM