मंगल जीवने
बल्लारपूर : जसजशी नगरपालिका व जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आहे, तसतशी मतदान करणाऱ्यांच्या येरझारा तहसील कार्यालयात होत आहे. कारण मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावापुढे छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे ५ जुलैनंतर मतदार यादीतून वगळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. तरीही मतदारांनी आपले फोटो ओळखपत्रावर अपलोड केले नसल्यामुळे भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यासाठी मुदत वाढ करण्यात आली असून, आता ९ ऑगस्ट ते ३१ आक्टोबर, २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मोहिमेत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांच्याद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील ९ हजार ८३६ जणांची छायाचित्रच यादीत नाहीत.
लोकशाहीमध्ये मतदानाला सगळ्यात महत्त्वाचे स्थान आहे. छायाचित्र नसल्याने मतदार यादीतून नाव वगळण्याची वेळ मतदानांवर आली आहे. काही मतदार स्वतः तालुका प्रशासनाकडे जाऊन छायाचित्र जमा करत आहे, तर काही नावात दुरुस्त्या करत आहे. जानेवारी, २०२१ पर्यंत बऱ्याच मतदारांनी ऑनलाइन प्रक्रिया पार पडली आहे. बल्लारपूर तालुक्यात १ लाख २१ हजार ८३६ मतदार आहेत. यापैकी ज्यांचे ओळखपत्रावर छायाचित्र नाही, असे ११ हजार ४५९ मतदारांनी छायाचित्र जमा केले नाही किंवा अपलोड केले नाही. प्रशासनाने घरोघरी सूचना देऊन सोशल मीडियावर जनजागृती केल्यामुळे १ हजार ७१३ मतदारांनी छायाचित्र अपलोड केले आहे, तरीही ९ हजार ८३६ मतदारांचे छायाचित्र आले नाही आहे. अनेक मतदार ऑनलाइन प्रक्रियाद्वारे फोटो अपलोड करत आहे.
बल्लारपूर नगरपालिकाची निवडणूक डिसेंबरमध्ये होते. यंदा मात्र अजूनही निवडणूक कार्यक्रम घोषित झाला नाही, तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत. या निवडणुका पूर्वी मतदारांचे छायाचित्र ओळखपत्रावर येणे गरजेचे आहे, अन्यथा अशा मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागेल.
बॉक्स
येथे जमा करा छायाचित्र
मतदार यादीची तपासणी करून आपल्या नावासोबत छायाचित्र आहे किंवा नाही याची तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात जाऊन चौकशी करावी. मतदार यादीत छायाचित्र नसल्यास त्वरित संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार यांच्याकडे छायाचित्र जमा करावे, असे आवाहन तहसीलदार संजय राईंचवार यांनी केले आहे.
बॉक्स
बल्लारपूर तालुका मतदार १,२१,३६७
बल्लारपूर शहर ८४,७२०
महिला मतदार ५९,३४२
पुरुष मतदार ६२,०२४