बाबूपेठ परिसरात कचऱ्याचे ढिगारे
चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ व नगिनाबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. काही ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने तसेच घंटागाडी येत नसल्याने बरेच जण मोकळ्या जागेवर कचरा टाकतात. हा कचरा उचलण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
तुकूम परिसरातील नाल्यांचा उपसा करावा
चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध वाॅर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वॉर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
व्यवहार करताना अडचण
चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, ब्रह्मपुरी आदी तालुक्यातील गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रोहयोची कामे देण्याची मागणी
चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूरची ओळख असली तरी ग्रामीण भागामध्ये आजही रोजगारासाठी बेरोजगार तसेच मजुरांना भटकंती करावी लागते. त्यामुळे गावागावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज खांब हटविण्याची मागणी
चंद्रपूर : वरोरा नाका परिसरातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रस्त्याचे सिमेंटीकरण झाल्यामुळे वाहन चालक भरधाव वेगाने येत आहेत. खांबामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने खांब हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बसस्थानकाच्या कामाला गती द्यावी
मूल : येथे सर्व सोयीयुक्त अद्ययावत बसस्थानकाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र आता ते काम बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बल्लारपूरच्या शहरातील बसस्थानकासारखे अद्ययावत बसस्थानकाचा आराखडा मूल शहरासाठी तयार करण्यात आला. त्याचे बांधकामही सुरू झाले होते, मात्र आता ते काम थंडबस्त्यात आहे.
अतिक्रमणामुळे ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता. मात्र सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून पायी चालतानाही त्रास सहन करावा लागत आहे. काही वाहनधारक बाजारातून दुचाकी चालवीत असल्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकही संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
चंद्रपूर: काही वर्षांपासून शेती पूर्णत: तोट्यात आली आहे. लागवडीचा खर्चदेखील निघत नाही. यावर्षी तर खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या
टेमुर्डा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पथदिव्यांची नियमित तपासणी करावी
चंद्रपूर : शहरातील काही परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर-नागपूर तसेच बल्लारपूर रस्त्यावरील पथदिवे अनेकवेळा बंद असतात.
प्रदूषणामुळे घुग्घुसचे नागरिक त्रस्त
घुग्घुस : औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे कोळसा वाहतूक तसेच सिमेंट कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत आहे. या प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
जनावरे विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे. दरम्यान, जनावरांना ठेवणेही दिवसेंदिवस कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी जनावरांची विक्री करीत आहेत.
बंद सिग्नलमुळे वाहनधारक त्रस्त
चंद्रपूर : येथील वडगाव, बापटनगर तसेच मिलन चौकात सिग्नल आहेत. मात्र ते बंद अवस्थेत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, अनेकवेळा वाहतूक कोंडीही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन बंद सिग्नल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला
चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली तसेच अन्य पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने, येथील कर्मचाऱ्यांना कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेरोजगारांना हवा आर्थिक आधार
वरोरा : तालुक्यात बेरोजगारांची संख्या अधिक असून त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. काही महिन्यापूर्वी सामाजिक संस्थेचे बेरोजगार मेळावा आयोजित करून प्रशिक्षण दिले होते. दरम्यान खाणीमध्ये काही कामगार कामाला जातात. मात्र त्यांच्या पाल्यांना काम नसल्याने नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहे. शासनाने विविध योजना राबवून हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
फायबर गतिरोधकामुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : अपघाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाने चंद्रपूर-नागपूर रोडवरील हुतात्मा स्मारक परिसरात फायबर गतिरोधक लावले आहे. मात्र ते अर्धेअधिक तुटले असून यामुळेच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काढून नव्याने बसवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनावश्यक सेवांनी मोबाईलधारक त्रस्त
खांबाडा : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर होत आहे. यामुळे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत.
पांदण रस्त्याची कामे त्वरित करावी
चंद्रपूर : रोजगार हमी योजनेची कामे मजुरांद्वारे केली जाते. मात्र मजुरी कमी मिळत असल्याने मजूर या कामावर जाण्याचे टाळत आहे. परिणामी अनेक गावातील पांदण रस्त्याची कामे रखडली आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे मजुरांकडून न करता विविध मशीनरीजच्या सहाय्याने करावे, अशी मागणी केली जात आहे.
फूटपाथवरील अतिक्रमण हटवावे
चंद्रपूर : शहरातील अनेक फूटपाथवर वाहन पार्किंग तसेच व्यापारी साहित्य विक्रीसाठी ठेवत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आधीच रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.