राज्यात मंत्री आहे, पण सरकारच नसल्यागत स्थिती; विजय वडेट्टीवार यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 12:40 PM2022-09-24T12:40:37+5:302022-09-24T12:40:45+5:30
ना मंत्रिमंडळाचा विस्तार ना पालकमंत्री नियुक्त, विकासकामे रखडली
चंद्रपूर : राज्यात तीन महिन्यांपूर्वी नवे सरकार स्थापन झाले असले तरी राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यासारखे आहे. ना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ना पालकमंत्र्यांची नियुक्ती. प्रशासन ठप्प आहे. शासनाने विकासकामे सुरू करण्याऐवजी अंदाजपत्रकात मंजूर केलेली कामे व सुरू झालेली विकासकामे रखडली आहेत. राज्यात विकास ठप्प झाला आहे. सरकारला राज्यातील जनतेची पर्वा नाही, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना केला.
खनिज विकास निधीचेही काम रखडले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. डीपीडीसीचा निधी दोन वर्षांत खर्च झाला नाही तर तो परत जातो. असे सुमारे २६८ कोटी रुपये खर्च झाले नाहीत. परत जाण्याचा धोका आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाजपला विकासविरोधी ठरवून ते म्हणाले की, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा विकास निधीचे काम बंद पाडले आहे. रुग्णालय, पंचायत समिती अगदी रस्त्याचे कामही ठप्प झाले आहे. अंदाजपत्रकात मंजूर झालेले काम रखडले आहे. हे काम थांबवण्यासाठी या सरकारचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवावे. लम्पीचा रोगाचा गुरांना धोका निर्माण झाला आहे; मात्र सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहेे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ३०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप त्याचे वितरण सुरू केलेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. राज्यात २४ तासांत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र हे सरकार उत्सव साजरे करण्यात मग्न आहे. शेतकऱ्यांना मदत करणारे हे सरकार नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, संचालक शेखर धोटे, चंद्रपूर शहर यु.सी.चे अध्यक्ष राजेश अडूर, माजी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे आदी उपस्थित होते.