प्रवीण खिरटकर
वरोरा (जि. चंद्रपूर) : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव गावाचे वरोरा तालुक्यातील सलोरी गावानजीक असलेल्या वन जमिनीवर पाच वर्षांपूर्वी स्थलांतरण करण्यात आले. मात्र या गावाला ना कुठल्या ग्रामपंचायतीत समाविष्ट केले, ना स्वतंत्र अशी ग्रामपंचायत दिली. त्यामुळे हे गाव मागील पाच वर्षांपासून विनाग्रामपंचायतीचे आहे. परिणामी येथील ग्रामस्थ विविध सोयी-सुविधा तसेच शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहेत.
ग्रामपंचायतीचा ठराव झाला, पण...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव हे भद्रावती तालुक्यातील गाव होते. वन्य प्राणी-मानव संघर्ष टाळण्याकरिता पळसगावचे सन २०१९मध्ये वरोरा तालुक्यातील सालोरी गावाजवळील वन विभागाच्या जागेवर स्थलांतरण करण्यात आले.
ग्रामस्थ घरे बांधून मागील पाच वर्षांपासून तिथे राहात आहेत. वन विभागाने नव्याने वसवलेल्या पळसगावात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत पुरवठा आदी सोयी-सवलती ग्रामस्थांना दिल्या. तसेच पळसगावजवळील वनली, खातोडा या गावांनी पळसगाव-वनली-खातोडा मिळून ग्रामपंचायत करण्याचा ठराव मंजूर केला.
परंतु, मागील पाच वर्षांपासून प्रशासनाने ग्रामपंचायतीची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे पळसगावातील ९० कुटुंबांना शासकीय दाखला घेण्याकरिता पूर्वीच्या भद्रावती तालुक्यात जावे लागत आहे. जुन्या रेकॉर्डनुसार दाखले मिळवावे लागत असल्याने त्यांना शारीरिक, आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वन विभागाने शेती दिली, सिंचन नाही
nवन विभागाने पळसगाववासीयांना शेती दिली. सिंचनाकरिता तलाव खोदून दिला. परंतु, शेतात सिंचनाकरिता विद्युत पुरवठा कोण करणार? याचा सोक्षमोक्ष अद्याप लागलेला नाही.
nशेतीचा ऑनलाइन सातबाराही अद्याप मिळालेला नाही. अद्यापपर्यंत पळसगाव वरोरा तालुक्यात समाविष्ट झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.