वरोरा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली पाहिजे, अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्यांना दिशा द्या, बुथ कमिटी मजबूत करा, जनसंपर्क वाढवा, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष आवश्यक असून, संघर्षाशिवाय यश कठीण आहे. संघर्षातून मार्ग काढला, तरच उद्याचा सूर्य राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
वरोरा तालुक्यातील मोहबळा येथील बावणे मंगल कार्यालयात वरोरा व भद्रावती तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे, माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे, महिला प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, रंजना पारशिवे आदी उपस्थित होते. यावेळी मोरेश्वर टेमुर्डे, राजेंद्र वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. विलास नेरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तालुकाध्यक्ष विशाल पारखी, जयंत टेमुर्डे, अविनाश ढेंगळे, चंद्रकांत कुंभारे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.