संदीप दिवाण : मीट द प्रेसमध्ये व्यक्त केल्या भावनाचंद्रपूर : पोलीस खाते हे शिस्तीचे खाते आहे. या खात्यात उच्च शिस्त असावी. त्यात तडजोड खपवून घेतली जाणार नाही. शिस्त मोडणाऱ्यांवर कडक कायवाई केली जाईलच, असे स्पष्ट प्रतिपादन नवे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी मंगळवारी केले.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांची मीट द पे्रस पार पडली. त्यावेळीे ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या पोलिसांवर प्रचंड ताण आहे, हे आपणाही अनुभवतो. मात्र शिस्त मोडून चालणार नाही. गडचांदुरातील एका मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यावर शिस्तभंग प्रकरणी केलेली कारवाई सांगून ते म्हणाले, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करीत आहेत. १६५ बिटातील कर्मचाऱ्यांसाठी हॅपीनेस प्रोग्राम आयोजित केले आहेत. १०५ बिटात कार्यक्रम झालेत. सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणार आहे. फिटनेसवर भर दिला जाणार आहे.गुन्हे नियंत्रण हे पोलीस खात्याचे आद्य कर्तव्य आहे. गुन्हे उघडकीस आणणे, त्याचा तपास योग्यपणे करणे आणि सक्षम पुराव्यासह प्रकरण न्यायालयात नेणे हे पोलिसांचे तीन मुख्य कर्तव्य आहेत. नागरिक आणि पोलीस यात सुसंवाद राहावा यासाठी प्रत्येक दखलपात्र गुन्ह्यात हवालदाराने भेट देणे आपण बंधनकारक केले आहे. ठाण्यात येणाऱ्या सर्व अर्जांची चौकशी व्हायलाच हवी, अशा सूचना दिल्या आहेत. ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी, किमान येणाऱ्यांना ग्लासभर पाणी आधी मिळावे, याकडे आपला कल आहे. पोलीस अधिकारी, बिट अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून त्या माध्यमातून आपण यंत्रणेच्या कामाचा आढावा घेत असतो, असेही ते म्हणाले. अलीकडे शिक्षेचे प्रमाण कमी झाल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. मात्र अधिकाऱ्यांनी नि:पक्षपणे काम करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दारूबंदीमुळे कामाचा ताण वाढल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात मान्य करून ते म्हणाले, गुन्हेगारांना कडक शासन व्हायला हवे. दारू आणणाऱ्यांसोबतच ती ठोकपणे विकणाऱ्यांवरही कारवाया आम्ही सुरु केल्या आहेत. दारूबंदीची २ हजार ४०० प्रकरणे आणि साडेतीन कोटी रूपयांची दारू जप्त केली.
शिस्तीसोबत तडजोड नाही
By admin | Published: July 15, 2015 1:08 AM