जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव : १३ संचालकांच्या सह्याब्रह्मपुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर यांच्या विरोधात १३ संचालकांनी अविश्वास दाखवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केल्याचे संचालकांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.नुकत्याच झालेल्या जि.प. व पं.स.च्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात झालेली बंडखोरी नानाविध कारणाने समोर येत आहे. विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर यांनी गांगलवाडी-मेंडकी या गटातून काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान देत बंडखोरी केली होती. त्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असला तरी बंडखोरीची ठिणगी अजुनही काँग्रेसच्या गोटात धगधगत असल्याने सभापती प्रभाकर सेलोकर यांच्या विरोधात १३ संचालकाच्या सह्यानिशी अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे सादर केले आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल केलेल्या संचालकामध्ये प्रमोद चिमूरकर, सुनीता तिडके, सुचित्रा ठाकरे, प्रकाश बुरडे, रणवीर ठाकरे, सुरेश दर्वे, मोरेश्वर पत्रे, दिवाकर मातेरे, राजेश तलमले, ब्रम्हदेव दिघोरे, नितीन उराडे, वामन मिसार यांच्या सह्या असून संचालकांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे, व्यापारी, अडते व संचालक यांच्यात समन्वय न साधणे, स्वमर्जीने व एकाधिकारशाहीने निर्णय घेणे, असे आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे २७ फेब्रुवारीला १३ संचालकांनी सह्यांनिशी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)तिकीट नाकारल्याने केली बंडखोरीविद्यमान सभापती हे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष होते. त्यांनी पक्षाचे तिकीट मागितले होते. परंतु तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षाकडे पाठविलेला होता व नंतरच त्यांनी निवडणूक लढविली होती. परंतु आता हा मोर्चा त्यांच्या सभापतीपदाकडे वळलेला असल्याने तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली अहे. या अविश्वास प्रस्तावावर काय निर्णय होणार आहे, यावरुन बरेच काही राजकारणाची गणिते पुढे वळण घेणार असल्याने सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ब्रह्मपुरी बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वास दाखल
By admin | Published: March 02, 2017 12:36 AM