नागभीड : येथील शिक्षण विभागात एकही शिक्षण विस्तार अधिकारी नाही. १० पैकी केवळ दोन केंद्र प्रमुख कार्यरत आहेत तर गटशिक्षण अधिकाऱ्याचा प्रभार शालेय पोषण आहार अधीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळाच बंद असल्या तरी वर्षभरापूर्वीपर्यंत शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी शासनाकडून विविध उपक्रम प्रस्तुत करण्यात येत होते. मात्र, त्याचवेळी या उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत नसल्याने हे उपक्रम खरोखरच सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचले असतील का, असा प्रश्न शिक्षण विभागातील या रिक्त जागा बघून निर्माण झाला तर तो अतिशयोक्तीचा ठरणार नाही.
नागभीड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा विचार केला तर येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांचे पद तीन वर्षांपासून रिक्त आहे तेव्हापासून हे पद भरण्याची तसदीच घेण्यात आली नाही. एखाद्या विस्तार अधिकाऱ्यांकडे पदभार देऊन नेहमीच या पदाचा गाडा हाकलणे सुरू आहे. आता तर शालेय पोषण अधीक्षकांकडे या पदाचा प्रभार आहे. येथील शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या ५ तर १० जागा केंद्रप्रमुखांच्या आहेत. मात्र, सध्या या ठिकाणी एक शिक्षण विस्तार अधिकारी कागदावर दिसत असले तरी या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडे सिंदेवाही येथील गटशिक्षण अधिकाऱ्याचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा नागभीडच्या शिक्षण विभागाशी काहीही देणे-घेणे उरले नसल्याची माहिती आहे. परिणामी नागभीड येथील शिक्षण विभाग विस्तार अधिकारीमुक्त झाला आहे.
बॉक्स
१० पैकी केवळ दोन केंद्रप्रमुख
केंद्रप्रमुखांच्या १० जागा या ठिकाणी आहेत. मात्र, सद्य:स्थितीत केवळ २ केंद्रप्रमुख या पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत आहेत.या केंद्रप्रमुखांची उणीव भरून काढण्यासाठी पदवीधर शिक्षकांना केंद्रप्रमुखांचा प्रभार सोपवून शिक्षण विभागाचा डोलारा चालविण्यात येत आहे.