जयंत जेनेकर - कान्हाळगावआगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चंद्रपूर येथे महानगरपालिका आहे. वरोरा, भद्रावती, मूल, राजुरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर येथे नगर परिषदेची स्वतंत्र यंत्रणा आहे. याशिवाय काही उद्योगांकडेही स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र पोंभुर्णा, जिवती, चिमूर, सिंदेवाही, कोरपना, नागभीड, गोंडपिपरी, सावली या तालुक्यात कुठलीच यंत्रणा नसल्याने जवळच्या नगर परिषद व उद्योगांच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. या तालुक्यात ही यंत्रणा असलेल्या स्थळांचे अंतर जास्त आहे. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन वाहन येतपर्यंत मोठे नुकसान होते. यातील काही तालुक्यांचा लोकसंख्या व क्षेत्रफळांच्या दृष्टीकोनातून विस्तार मोठा आहे. एखादी आगीची घटना घडल्यास त्या गावात दोन-तीन तासानंतर वाहने पोहचतात. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान होते. प्रभावी सुरक्षा साधने नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. यातील काही अग्निशमन दलाची वाहने नादुरुस्त असल्याने त्याचाही फटका अनेकवेळ बसतो. आगीमुळे होणारे नुकसान कमी होण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असली तरी, प्रत्यक्षात सर्वकाही संपल्यावर वाहने दाखल होतात अशी अवस्था आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथेही पुरेसे कर्मचारी नाही. अनेकवेळा येथूनही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते. मात्र दल अनेकवेळा वेळेवर पोहचतच नाही.प्रत्येक तालुकास्तरावर अग्निशमन विभाग उभारून अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्याचा विस्तार मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औद्योगिक जिल्हा असल्याने अपघाताच्या घटना नेहमी घडत असतात, अशावेळी अग्निशमनय यंत्रणा अद्यावत असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हास्तरावरून अग्निशमन यंत्रणेसाठी पाऊल उचलने महत्वाचे आहे . (वार्ताहर)
आठ तालुक्यांत अग्निशमन यंत्रणा नाही
By admin | Published: December 31, 2014 11:22 PM