वेकोलि प्रकल्पग्रस्त : केंद्रीय मंत्र्यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चाराजुरा : तालुक्यातील धोपटाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा, सुब्बई, चिंचोली येथील जमिनी अधिग्रहित केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकल्पाला जलद गतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न करुन प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन केंद्रीय राज्यगृहमंत्री हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण मंडपाला भेटी दरम्यान बोलताना दिले. केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार जीएम कार्यालयामध्ये वेकोलिचे डायरेक्टर पर्सनल डॉ. संजय कुमार यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त शेतकरी, शासकीय अधिकारी यांची दोन तास बैठक झाली. यावेळी वेकोलिचे जीएम आर. के. मिश्रा, नागपूरचे अधिकारी आनंद आझमी, बी. के. गुप्ता, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी विजय चन्ने, नियोजन अधिकारी मनोज नवले, राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे उपस्थित होते. मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरुच असून राजू मोहारे, विकास घटे, सोनू गाडगे, बाळू जुलमे, बालाजी पिंपळकर, रवींद्र बोबडे, पुष्पा बुधवारे, मुर्लीधर फटाले आदी शेतकरी आमरण उपोषण करीत आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती खालावत असून त्याच्या समर्थनार्थ २०० महिला पुरुष रात्रदिवस उपोषणाला करीत आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी शासकीय अधिकारी, पोलीस विभाग सर्वोतोपरी मदत करीत आहे. परंतु राष्ट्रीय स्तरावरील १० सदस्यीय बोर्ड बैठकीमध्ये या खदानीला मंजुरी मिळणार नाही, तोपर्यंत प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न सुटणे कठीण आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी सकारात्मक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी) बार्डाच्या बैठकीशिवाय तोडगा अशक्यवेकोलिचे डायरेक्टर (पर्सनल) डॉ. संजय कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील बोर्डाच्या बैठकीत मार्च महिन्यात प्रकल्पांच्या मंजुरीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि यामध्ये निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील १० सदस्य असून धोपटाळा प्रकल्प सुरु करण्यासाठी बोर्डाच्या बैठकीची परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही काहीच करु शकत नाही. कोळसा खरेदीकरिता ग्राहक उपलब्ध नाही. त्याकरिता महाजनकोकडे विनंती केली आहे. वीज प्रकल्प बंद होत असल्यामुळे कोळसा विक्री मंदावली असून वेकोलिच्या मार्फत प्रयत्न सुरु आहेत.प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरुच राहणार- विजय चन्नेउपोषणाचा पाचवा दिवस असून मागील पाच वर्षांपासून नोकरी आणि पैशाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे ८७१ हेक्टर जमीन आणि १ हजार ८० नौकऱ्याचा ज्वलंत प्रश्न आहे. वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन समाधान न झाल्यामुळे बेमुदत उपोषण सुरुच ठेवण्यात येत असल्याचे विजय चन्ने यांनी सांगितले.
संचालकाच्या मध्यस्थीनंतरही तोडगा नाही
By admin | Published: February 07, 2017 12:32 AM