सिंदेवाही : शहरातील प्रभाग क्रमांक १२ व १७ दसरा वाॅर्डातील काही परिसरात नळाचे पाईपलाईन चोकअप असून मागील दहा वर्षांपासून येथील रहिवाश्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
वारंवार तक्रार करूनही याकडे लक्ष दिले जात नाही, परिसरातील नागरिक दुसऱ्याच्या नळावर जाऊन पिण्यासाठी पाणी भरत असतात. नळ आहे पण पाणी नाही, यावर काहीच उपाय निघत नसल्याने आता शिवसेनेने कंबर कसली आहे. येथील नागरिकांनी नगरपंचायत, तहसील, पोलीस विभाग यांना निवेदन सादर करून येणाऱ्या सात दिवसात यावर काही तोडगा काढावा, असा इशारा दिला. निवेदन देताना ब्रह्मपुरी क्षेत्राचे युवासेनेचे अध्यक्ष आशिष चिंतलवार, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र मंडलवार, शहर प्रमुख प्रीतम नागोसे, विशाल लोखंडे, रवी सगराम, श्याम गंडाईत, नवाब शेख, वैभव मडावी, प्रतीक जयस्वाल उपस्थित होते.