लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कुणीही उपाशी राहू नये, यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रसंचालकांना शासनाकडून प्रति थाळी अनुदान ठरवून देण्यात आले. विशिष्ट वेळेपर्यंतच हे केंद्र सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरुन दररोज १५ ते २० जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाकाळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, मजूर, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रातून दररोज साधारणत: तीन हजार ७०० लोकांना जेवन दिले जाते. कोरोनाकाळात चंद्रपुरात अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईसुद्धा राहतात. त्यातील गोरगरिब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंतच असते. त्यातही थाळीची संख्या ही मोजकीच आहे. त्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या तसेच वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.
रोज तीन हजार ७०० जणांचे पोट भरते, बाकीच्याचे काय?
जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. त्या केंद्राचा लाभ साधारणत: तीन हजार ७०० जण घेत असतात. परंतु, अनेकजणांना थाळी भेटत नसल्याने गेल्यापावली परत यावे लागते. एका केंद्रावरुन किमान १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्राची संख्या तसेच थाळी संख्या वाढवावी, त्यासोबतच जेवन वितरीत करण्याची वेळ वाढविण्याची गरज आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेकजण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे येथील केंद्रावरील थाळी लवकरच संपत असते. या केंद्रावर साधारणत: १५ ते २० जण परत जात असतात.
बसस्थानक केंद्र शहरात कामानिमित्त अनेकजण येत असतात. बसस्थानकाशेजारी केंद्र असल्याने अनेकजण या केंद्रावर जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच रांग दिसून येते. परिणामी येथील थाळी लवकरच संपत असते. त्यामुळे साधारणत: दहा ते बाराजण परत गेले.