चंद्रपूर : लग्नाच्या स्वागत सोहळ्यात डीजेवर नाचताना वाद झाला. एकाने मध्यस्थी करून वाद सोडविला. मात्र, याच राग मनात ठेवून घरी परत जाताना त्याला वाटेत अडवून मारहाण केली. दरम्यान, वडील मुलाला वाचविण्यासाठी गेले असता, त्यांच्याच डोक्यावर काठीने जबर वार करून ठार केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरातील रामसेतू उड्डाणपुलावर घडली. किशोर नत्थूजी पिंपळकर (४८, रा. तिरवंजा, ता. भद्रावती) असे मृतक वडिलांचे नाव आहे, तर ओम किशोर पिंपळकर (१८, रा. तिरवंजा, ता. भद्रावती) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
१५ जून २०२३ रोजी बाबूपेठ येथील संदीप पिंपळकर यांचा लग्नाचा स्वागत सोहळा दाताळा मार्गावरील शो मॅन सेलिब्रेशन येथे आयोजित केला होता. यात डीजेच्या तालावर नाचताना राजू शेंडे याचा बाबूपेठ येथील युवकांशी वाद झाला. यावेळी ओम पिंपळकर याने मध्यस्थी करून वाद सोडविला. मात्र, यांचा त्या मुलाला राग आला. त्याचा वचपा काढण्याच्या अनुषंगाने ते सर्वजण रामसेतू उड्डाणपुलावर पाळत ठेवून होते. दरम्यान, ओम हा राजू शेंडे, अजय शेंडे यांच्यासह दुचाकीने घराकडे जायला निघाला. त्याच्या माघे ओमचे वडीलही किशोर पिंपळकर दुसऱ्या दुचाकीने येत होते. त्या मुलांना ओम दिसताच त्यांनी त्याला रामसेतू पुलावर अडवून भांडणात मध्यस्ती का केली म्हणून ओमला मारण्यास सुरुवात केली. मुलाला मारत असल्याचे बघून वडील किशोर पिंपळकर मध्ये गेले. दरम्यान, त्या मुलांनी किशोर पिंपळकर यांच्या डोक्यावर काठीने जोरदार वार केला. ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच मारेकरी पसार झाले. जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांच्या चमूनी पाचही जणांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, सुदाम राठोड करीत आहेत.
आरोपींची ओळख परेड होणारपोलिसांना माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. परंतु किशोर पिंपळकर यांचा मृत्यू झाला, तर ओम पिंपळकर हा जखमी असल्याने आरोपींची ओळखपरेड करण्यात आली नाही. रविवारी त्याची ओळखपरेड करण्यात येणार आहे.