दुबार पेरणीचे संकट : अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका पेंढरी (कोके) : सतत सहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे गोंदेडा व परिसरातील शेतातील धानाचे पऱ्हे सडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून होत आहे. पेंढरी(कोके), केवाडा (पेठ) गोंदेडा, वडसी खातोडा, महादवाडी, मोटेगाव, गोरवट, काजळसर, खुटाळा, खांबाडा व इतर भागात ७ ते १२ जुलै पर्यंत रात्रंदिवस मुसळधार पाऊस झाला. यात अतिवृष्टी होऊन या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे सतत दहा दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे सडून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे रोवणे होणे कठीण आहे. सध्या दुबार पेरणीचे संकट ओढवले असून शासनाने पऱ्ह्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आनंद कावळे, तुकडोजी सोनुले, देवराव सोनुले, राजेराम सोनुले, सुरेश डांगे, सुधाकर वाढई व इतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)
गोंदेडा परिसरात धानाचे पऱ्हे सडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 1:56 AM