लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सोनाग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान त्रुटी आढळलेल्या पाच सोनोग्राफी आणि चार गर्भपात केंद्रांस नोटीस बजावली तर एक गर्भपात केंद्रांची परवागनी तात्पुरते निलंबित करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत प्रत्येकी तीन सदस्यांच्या एकूण चार समित्या गठित करून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ५० सोनोग्राफी केंद्र व ३३ गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. ज्या तालुक्यात सोनोग्राफी व गर्भपात केंद्र अस्तित्वात आहे, त्या सर्व केंद्रांना भेटी देऊन पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यानुसार सखोल तपासणी करण्यात आली. या मोहिमेंतर्गत त्रुटी आढळल्यामुळे पाच सोनोग्राफी केंद्र आणि चार गर्भपात केंद्रास नोटीस बजावण्यात आली तर एक गर्भपात केंद्र तात्पुरते निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सोनाग्राफी व गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले.
चंद्रपुरातील आणखी काही केंद्र प्रशासनाच्या रडारवरचंद्रपुरात गत पाच वर्षांत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची संख्या वाढली. मात्र, काही डॉक्टरांनी पैशाच्या लोभापाई अवैध गर्भपात व सोनोग्राफी करीत असल्याची शंका आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एक प्रकरण उघडकीस आल्यानंतर चंद्रपुरातही असे प्रकरण घडत असल्याच्या चर्चेला पेव फुटले होते. २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या तपासणी मोहीम झाली असली तरी काही केंद्र प्रशासनाच्या रडारवर आहेत.
त्रुटींची पुर्तता न केल्यास कारवाई- सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांनी त्रुटींची पूर्तता करण्याची नोटीस बजावण्यात आली. - विहित कालावधीत या केंद्रांकडून समाधानकारक पूर्तता केली नाही तर आणखी कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने केल्या आहेत.