दिलीप मेश्राम
नवरगाव : ब्रम्हपुरी वनविभागा अंतर्गत येत असलेल्या नवरगाव परिसरात मागील काही वर्षामध्ये वर्षाच्या शेवटी सहा वाघांचा मृत्यू झाल्याने वर्षाचा शेवट वाघांसाठी धोकादायक ठरलेला आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेञाअंतर्गत नवरगाव परिसरात सर्वत्र जंगल असून या परिसरातुन उमा नदी वाहते. नदीच्या अलिकडे सिन्देवाही वनपरीक्षेञ तर पलीकडे शिवणी वनपरिक्षेञ, पळसगांव वनपरिक्षेञ असे तीनही वनपरिक्षेञ लागून आहेत. शिवाय शिवणी -पळसगांव वनपरिक्षेञाचा भाग हा ताडोबा अभयारण्यात येत असल्याने वाघांचे माहेरघर याच परिसरात आहे. दिवसेंदिवस ताडोबामध्ये वाघांची संख्या वाढत असल्याने परिसर कमी पडत आहे. नैसर्गिक पध्दतीने वाघ हा एकटे जीवन जगण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी स्वतःचा परिसर आणि शिकार शोधण्यासाठी त्याची सतत भटकंती सुरू असते. स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी या क्षेत्रातून त्या क्षेत्रात मार्गक्रमण सुरू असते. हे सुरू असताना वाघांनाही अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो. कधी इतर प्राण्यांशी तर कधी इतर वाघांशीच झुंज करावी लागते. यामध्ये झुंजीत कधी जीवही गमावण्याची वेळ वाघांवर येते.
वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन वनविभागाने यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि अलिकडेच लागुनच घोडाझरी व्याघ्र प्रकल्प निर्माण केला. तरीही वाघाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून वन्यप्राणी आणि मानव यांच्यामध्येही संघर्षाला सुरूवात झाली आहे.
कधी मानव वाघाच्या निवासात (जंगलात) तर कधी वाघही मानवी वस्तीत घुसायला सुरूवात झाल्याने सर्वत्र हा संघर्ष अधिक गंभीर स्वरूप धारण करीत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास जीवन जगण्यासाठी प्राधान्य मानवाला द्यायचे की वाघांना असाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिन्देवाही वनपरिक्षेञातील नवरगाव परिसरात मागील आठ वर्षात नोव्हेंबर- डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सहा वाघांचा मृत्यू झाला. यावर्षीही १२ डिसेंबर २०२० ला खांडला या गावालगत वाघीण मृतावस्थेत आढळली. वर्षातील इतर महिन्यात मेले ते वेगळेच. त्यामुळे या परिसरात वर्षाचा शेवट माञ वाघांसाठी घातक ठरतो आहे, हे विशेष.
बॉक्स
आतापर्यंत असे झाले मृत्यू
१९ डिसेंबर २०१२ ला रत्नापुर -शिवणी मार्गावरील बेहदंड परिसरातील विहिरीमध्ये वाघिणीघा मृत्यू
१६ डिसेंबर २०१४ ला शिवणी उमा नदी परिसरातील विहिरीमध्ये वाघाचा मृत्यू.
२० डिसेंबर २०१४ ला आलेसूर गावातील विहिरीमध्ये बिबट्याचा मृत्यू
१३ डिसेंबर २०१५ ला आलेसूर परिसरात वाघाघा मृत्यू .
४ डिसेंबर २०२० रोजी नाचनभट्टी शेतशिवारामध्ये वाघाचा मृत्यू.
१२ डिसेंबर २०२० ला खांडला गावाजवळ वाघिणीचा मृत्यू
बॉक्स
विद्युत करंटनेही अनेक वाघांचा मृत्यू
वन्यप्राणी शेतात येऊन पिकांचे नुकसान करतात. यायर उपाय म्हणून बरेच शेतकरी शेतीभोवताल कुंपण घालून त्यावर विद्यत करंट सोडतात. अशा प्रकारे शेतीचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नातसुध्दा अनेक वाघांचा जीव गेलेला आहे.