चंद्रपूर : शहरातील फुटपाथवर व अनेक ठिकाणी लघुव्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली. व्यावसायिकांकडून महापालिका कर वसूल करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मोहीम राबवून ओळखपत्र दिले जात होते. पण ते बंद करण्यात आले. शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी पुन्हा सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
बंगाली कॅम्प परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस
चंद्रपूर : बल्लारपूर मार्गावरील बंगाली कॅम्प पोलीस ठाण्यालगतच्या उड्डाणपुलावर मोकाट कुत्र्यांचा ठिय्या असतो. रात्री या मार्गावरून गेल्यास मोकाट कुत्री पाठलाग लागतात. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. शिवाय शहरातील पठाणपुरा, हॉस्पिटल वॉर्ड, रामनगर प्रभागँतही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे.
रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिक हैराण
गोंडपिपरी : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाने मोठ्या रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे तालुकास्थळाला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कडाक्याच्या थंडीने तालुक्यात धुके
राजुरा : तालुक्यातील तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याची थंडी सुरू झाली. मागील आठवड्यापासून वातावरणात सतत गारवा कायम आहे. दररोज सकाळी धुकी दिसत आहेत. थंडीमुळे काहींना सकाळी बाहेर निघणे कठीण झाले. पण, हाच ऋतू प्रकृतीसाठी उत्तम असल्याने सकाळी फिरणाऱ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे.
विनापरवाना वाहने चालवू नका
चंद्रपूर : दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मोहीम सुरू केली. त्यामुळे विनापरवाना वाहन न चालविता प्रशिक्षण घेऊन परवाने प्राप्त करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वर्दळीच्या मार्गावर वाहने ठेवल्याने कोंडी
मूल : शहरातील वर्दळीचा गांधी चौक व अन्य वॉर्डांतील भरचौकात वाहने ठेवण्याचे प्रकार वाढीस लागले. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेने या चौकात सूचनाफलक लावले. मात्र, याकडे दुर्लक्ष करून वाहने उभी ठेवतात.
गतिरोधक तयार करा
चंद्रपूर : येथील कस्तुरबा मार्गावरील ज्युबिली हायस्कूलजवळ गतिरोधक नाही. जिल्हा सामान्य रुग्णाला मुख्य मार्गावर येतात. त्यामुळे गर्दी वाढते. संभाव्य धोका लक्षात घेऊन या ठिकाणी गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विठ्ठल मंदिर परिसरातील नाल्यांचा उपसा करावा
चंद्रपूर : विठ्ठल मंदिर परिसरातील विविध वॉर्डात घाण साचल्याने नागरिक हैराण आहेत. वॉर्डातील नाल्या घाणीने तुडुंब भरल्या आहेत. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. त्यामुळे महापालिकेने स्वच्छता मोहीम सुरू कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.