लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : बारा दिवस झालेय. त्यांची पायपीट सुरू आहे. त्यांना त्यांच्या गावी पोचायला आणखी चार ते पाच दिवस लागतील. तेव्हाच त्यांची ही पायपीट थांबणार आहे आणि त्यांचा जीव भांड्यात पडणार आहे.मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असलेले हे मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे गेले होते. जेमतेम आठ दहा दिवस काम केले आणि देशात कोरोनाने थैमान घालणे सुरू केले. सरकारने या आजारास आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मजुरांनाही त्याचा फटका बसला. कंत्राटदाराने काम बंद करुन मजुरीही देणे बंद केले. या मजुरांजवळ जे काही शिल्लक होते त्यावर काही दिवस भागले. त्यानंतर उपासमार होऊ लागल्याने त्यांनी गावाचा रस्ता धरला. तीन महिला, त्यांची दोन छोटी मुले व आठ पुरूषांचा हा जत्था शुक्रवारी नागभीडवरून पायदळ जात असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपली आपबिती कथन केली. यातील शिवकुमार डोंगरे व अशोक वैद्य यांनी सांगितले की, १२ दिवसांपूर्वी हैद्राबाद सोडले. दिवसभर प्रवास करायचा आणि रात्री एखादे गाव बघून मुक्काम करायचा. अशाप्रकारे आतापर्यंत साडेसहाशे ते सातशे किमीचे अंतर कापून झाले आहे. सोबत महिला व लहान मुले असल्यामुळे त्यांना प्रवास हळू करावा लागत आहे. या प्रवासातील आठवणी सांगताना त्यांनी सांगितले की, वाटेत आम्हाला कधीही उपासी राहावे लागले नाही. प्रत्येक ठिकाणी सहकार्य मिळाले. गावी पोचायला आणखी चार दिवस तरी लागतील असे सांगून समोर निघून गेले.
१२ दिवसांपासून त्यांची पायी मजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 5:00 AM