घनश्याम नवघडे ल्ल नागभीडअड्याळ टेकडी ! गावगणराज्याचे एक विद्यापीठच! या विद्यापीठाच्या कुलगुरुंचे दहा वर्षापूर्वी म्हणजे ८ जून २००६ रोजी महानिर्वाण झाले. तरीही त्यांच्या स्मृती जपण्यासाठी ते येतात आणि अनिभिष भावनेने या कुलगुरुंच्या समाधीस्थळापुढे नतमस्तक होऊन आठवणीत रंगून जातात.तुकाराम दादा गीताचार्य हे या कुलगुरुंचे नाव. नागभीड तालुक्यातील कोर्धा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भात गिरणीच्या उद्घाटनासाठी आले असता अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले आणि या स्थळाची त्यांना भुरळच पडली. गीताचार्य तुकारामदादा यांच्याकडे मग त्यांनी त्या स्थळाची सुत्रे सोपविली. या अड्याळ टेकडीवर दादांनी कुठलीही शासकीय मदत न घेता या अड्याळ टेकडीवर केवळ श्रमदानातून गावगणराज्याचे नंदनवन फुलविले. खेडे स्वयंभू कसे होतील, ग्रामसभा स्वयंभू आणि सर्वोच्च कशी आहे, याचे महत्त्व आयुष्यभर लोकांना पटवून दिले. दादांनी संपूर्ण हयात याच कामात खर्ची घातली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून गावगणराज्याचे धडे दिले.अशा या अड्याळ टेकडीच्या शिल्पकाराने आणि गावगणराज्याच्या कुलगुरु ने ८ जून २००६ रोजी देह ठेवला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखोचा जमाव अड्याळ टेकडीवर जमला होता. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरावेत, यासाठी दरवर्षी अड्याळ टेकडीवर त्यांचा स्मृतीदिन आयोजित करण्यात येतो. दादांच्या कार्यावर श्रद्धा असलेले, दादांवर मनापासून प्रेम करणारे हजारो गुरुदेव भक्त नेमाने अड्याळ टेकडीवर येत असतात.बुधवारीही अड्याळ टेकडीवर दादांचा स्मृतीदिन आयोजित करण्यात आला होता. केवळ परिसरातीलच नाही तर संपूर्ण विदर्भातून शेकडोंनी या कार्यक्रमाला हजेरी लावून दादांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण अड्याळ परिसर पालथा घातल्यानंतर दादांना ज्या ठिकाणी चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी येवून दादांच्या समाधीस्थळापुढे नतमस्तक होत. ज्यांना दादांचा सहवास लाभला अशी ज्येष्ठ मंडळी दादांच्या आठवणीत रंगून गेल्याचे दृष्य दिसत होते.कोणतेही निमंत्रण नाही, कोणता कोणाला सांगावा नाही. केवळ दादांवर असलेल्या श्रद्धेपोटी हे लोक आले होते. अड्याळ टेकडीच्या परिसरात दादांनी केलेल्या कार्याला मूक मनाने ते सलामी देत होते.
ते येत होते आणि नतमस्तक होत होते
By admin | Published: June 09, 2016 1:16 AM