नागभीड : सध्या नुसता कोरोना हा शब्द जरी काढला तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसत आहे. अशा भयावह परिस्थितीत नागभीड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाने मृत्यू पावलेल्या ४० व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगाची आणि जगण्याची परिभाषाच बदलली आहे. अगदी जवळच्या प्रिय माणसाचा मृत्यू कोरोनाने झाला असे नुसते समजले तरी आजवर जोपासलेले नातेसंबंध आणि जिव्हाळ्यातील ऋणानुबंधाच्या गाठी जागच्या जागी तुटून पडत आहेत. आजवर याच व्यक्तीच्या चिंतेने डबडबणारे डोळे आज समोर त्याचा मृतदेह दिसत असूनही कोरडे आहेत. त्या निर्जिव कलेवरास हात लावायची कोणात हिंमत उरली नाही. अशा परिस्थितीत मृतांच्या आप्तेष्टांनी नाकारले असले तरी, पोटाची खळगी भरण्यासाठी नगर परिषदेची चाकरी करणाऱ्या चाकरमान्यांना आपले कर्तव्य विसरता येत नाही. त्यांना आपले कर्तव्य बजवावेच लागते.
नागभीड नगर परिषदेचाच विचार करता ६ एप्रिल ते १० मे या कालावधीत नागभीड नगर परिषदेच्या या कर्मचाऱ्यांनी अशाच ४० व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत. यात प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, स्वच्छता लिपिक परशराम वंजारी, पर्यवेक्षक राम रगडे, लक्ष्मीकांत तुपट, राजेंद्र, मिसार, केवळ गजभे, निरंजन प्रधान, किशोर रामटेके व अमिताभ चहांदे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनाही स्वतःच्या जीविताची भीती असली तरी काळजावर दगड ठेवून ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत.