सतीश जमदाडे
आवाळपूर : पारंपरिक शेतीतून आर्थिक वृध्दी होत नसल्याने शेतीसोबत जोडधंदा हा मार्ग शेतकरी आता पत्करू लागला आहे. कोरपना तालुक्यातील धामणगाव येथील एका शेतकऱ्याने शेतीसोबत कुक्कुटपालन केले असून, वर्षाला लाख रुपये तो कमवत आहे. शेतीसोबत जोडधंदा आर्थिक उन्नतीसाठी किती महत्त्वाचा आहे, हे त्याने यातून दाखवून दिले आहे.
कोरपना तालुक्यातील स्मार्ट ग्राम बिबीअंतर्गत येत असलेले धामणगाव हे छोटेसे गाव. येथील बहुतांश नागरिक शेतीवर निर्भर आहेत. त्यामुळे गावातील प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. शेतीतून आर्थिक वृद्धी होत नसल्याने रमेश टोंगे नामक शेतकऱ्याने आपल्या अर्धा एकर शेतात दोन वर्षापूर्वी शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन सुरू केले.
कुक्कुटपालनासाठी पिले ही बाहेरून विकत आणली जातात. त्यात सर्व गावठी कोंबड्यांच्या पिलांचा समावेश आहे. मोठी झाल्यानंतर ती ४०० रुपये किलो याप्रमाणे विकली जातात. रमेश टोंगे हे स्वतः कुक्कुटपालन करत असल्याने नेहमी खाद्य तेच देतात. त्यामुळे त्या कोंबड्यांनासुद्धा त्यांची सवय झाली आहे. ते हाक देताच सर्व कोंबड्या एकत्र येतात, हे विशेष.
बॉक्स
वर्षाला काढतात ४ बॅच
कुक्कुटपालनासंदर्भात अधिकची माहिती घेऊन आणि अभ्यास करून नियोजनबध्द बॅच काढण्याचे टोंगे यांनी ठरविले. एक बॅच एक हजार पिलांची असून या बॅचला तीन महिने लागतात. याप्रमाणे वर्षाला ते चार बॅच काढतात.
बॉक्स
खर्चापेक्षा उत्पन्न दुप्पट
वर्षाला चार बॅच काढत असल्याने त्यांना खर्चसुद्धा त्याच पद्धतीने येतो. मात्र उत्पन्न दुप्पट असल्याचे ते स्वतः सांगतात. एक बॅच म्हणजेच एक हजार पिलांना जवळपास एक लाख ६० हजार रुपये खर्च येतो, तर त्याच एका बॅचचे उत्पन्न हे ३ लाख ५० हजार रुपये होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
शेतकऱ्यांनी पूर्णत: शेतीवर अवलंबून न राहता, त्यासोबत जोडधंदाही केला पाहिजे. जेणेकरून आपल्या कुटुंबाची आर्थिक वृध्दी होईल. तसेच कुक्कुटपालनाबाबत ज्या शेतकऱ्यांना माहिती किंवा मार्गदर्शन हवे असेल, तर ते मी देण्यास नेहमी तयार आहे.
- रमेश टोंगे, शेतकरी, धामनगाव.
210921\screenshot_20210919-115220__01.jpg
अर्ध्या एकर मध्ये करीत असलेले कुकुटपालन