प्रमोद येरावार लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : शासकीय नोकरीच्या कार्यकाळात या गावातून त्या गावात बदली ही ठरलेलीच असते. ‘विंचवाचं ओझं पाठीवर’ अशी म्हण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वापरली जाते. मात्र काही गावात जीव गुंततो. ज्या गावात पहिल्यांदा कर्तव्य बजावले, ते गाव गाठण्यासाठी एका ७८ वर्षीय निवृत्त ठाणेदाराने मुंबईहून थेट कोठारी गाव गाठले. पोलीस ठाण्यात पाय ठेवताच ते गहिवरले. त्या ठाणेदाराचे नाव आहे बालाजी झाल्टे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून उपस्थित पोलीस कर्मचारीही भावुक झाले.आपल्या रागीट स्वभावाने पोलीस ओळखले जातात. वरवर पाषाणहृदयी दिसणारे हे पोलीस दादा कापसाचे हृदय घेऊन जगतात. याचा प्रत्यय कोठारीकरांना नुकताच आला. जून १९७२ मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक पदावर बालाजी झाल्टे कोठारी पोलीस ठाण्यात रूजू झाले होते. हे त्यांचे पहिले पोलीस ठाणे. काही काळ कोठारीत कर्तव्य बजावल्यावर झाल्टे यांची बदली झाली. त्यानंतर अनेक पोलीस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले. आज ते ७८ वर्षांचे झालेत. ते सध्या मुंबईला वास्तव्यास आहेत. ज्या गावात त्यांनी ठाणेदार म्हणून पहिल्यांदा पाय ठेवले, त्या गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हातारपणाने शरीरही थकलेले. तरीही त्यांनी थेट मुंबईहून कोठारी गाठले. कोठारी पोलीस ठाण्यात पाय ठेवताच ते गहिवरले.
जुन्या आठवणीत रमताना डोळे पाणावलेकोठारी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत ठाणेदार तुषार चव्हाण यांनी विचारपूस केली असता बालाजी झाल्टे यांनी पोलीस ठाण्यात येण्याचे कारण सांगितले. हे ऐकून चव्हाणही थक्क झालेत. जुन्या आठवणींना झाल्टे यांनी उजाळा दिला. जुन्या आठवणीत रमताना झाल्टे यांचे डोळे पाणावले. उपस्थित पोलीसही भावुक झालेत. कोठारी पोलिसांनी शाल, श्रीफळ देऊन झाल्टे यांचा सत्कार केला.