चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी अद्यापही प्राथमिक शाळा अद्यापही बंद आहेत. त्यामुळे मागील ११ महिन्यांपासून विद्यार्थी घरी बसून कंटाळले आहेत. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आमचीही शाळा सुरु करा, असा हट्ट विद्यार्थी करू लागले. मात्र शहरी भागातील पालक आजही विद्यार्थ्याना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नाही. मार्च २०१९ पासून कोरोना संकट आले. त्यामुळे तेव्हापासून जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, शाळांना सुटी देण्यात आली ती आजपर्यंत सुरुच आहे. विशेष म्हणजे, २७ जानेवारीपासून सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोनाचे नियम पाळून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे. तर त्यापूर्वी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहे. त्यामुळे आता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरु होणार असल्याची आशा लागली आहे.
बाॅक्स
ग्रामीण पालकांची वेगळीच चिंता
पहिली ते चवथीचे वर्ग अद्यापही सुरु झाले नाही. त्यामुळे या लहान मुलांना ठेवण्याचा प्रश्न ग्रामीण पालकांना पडत आहे. कोरोना संकटातही ते पाल्यांना शाळेमध्ये पाठविण्याच्या तयारीत होते. मात्र शाळा सुरु झाली नसल्याने ते हतबल झाले आहे. ग्रामीण भागात बहुतांश पालक शेतकरी तसेच शेतमजूर म्हणून कामाला जातात. दिवसभर शेतात राबतात. आई-वडील दोघेही कामाला गेल्यानंतर मुले एकटीच घरी राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर शाळा सुरु झाल्यास किमान १० ते ५ या वेळात ते शाळेमध्ये सुरक्षित राहतील, असे ग्रामीण पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळा सुरु करून दिलासा देणे गरजेचे आहे.
-
शाळेला खूप दिवसांपासून सुटी आहे. आता शाळा सुरू करून आम्हाला शाळेत जायचे आहे. आमच्या गावातील ५ वीपासूनचे सर्व जण शाळेत जातात.
फक्त आमचीच शाळा बंद आहे. सर शाळेत येतात, त्यामुळे आम्हाचीही आता शाळा सुरु करावी.
-लक्ष्मी नंदकिशोर बारसागडे
वर्ग ४ था
जि.प.शाळा, डोंगळहळदी
--
सर शाळेत येतात आणि शाळा सुरु केली जाते. मात्र आम्हाला अजूनही सुटीच आहे. आम्ही सरांकडे पुस्तक घेऊन जातो. ते अभ्यासाचे सांगतात. आता शाळा सुरु झाली की अभ्यास करायचा आहे.
-नित्यानंद विलास बुरांडे
वर्ग ३ रा.
जि.प.शाळा, डोंगळहळदी
---
आमच्या मॅडम मोबाईलवर अभ्याक्रम पाठवितात. आम्ही तो घरी सोडवून घेतो. मात्र त्यातून समजत नाही. आता शाळा सुरु झाली की दररोज शाळेत जाणार आहे.
-अनिकेत कुनघाडकर
वर्ग ३ रा
बोर्डा बोरकर
---
सर्वांच्या शाळा सुरु झाल्या आहे. फक्त आम्हालाच सुटी आहे. शाळेत सर, मॅडम येतात. त्यांच्याकडे आम्ही जातो. पण अजूनही शाळा सुरुच झाली नाही. सुटी खूप झाली. आता शाळा सुरु व्हायला पाहिजे.
वर्ग ४ था
बोर्डा झुलूवार
---
पालक काय म्हणतात...
कोरोना रुग्ण संख्या घटली असली तरी अद्यापही कोरोनाचे संकट गेलेले नाही. माध्यमिकच्या शाळा पूर्ण क्षमतेने अद्यापही सुरु झाल्या नाही. महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरु करण्याची शासनाने घाई करू नये.
-मनीष बानकर
पालक, चंद्रपूर
----
सध्या विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. त्यामुळे शाळा सुरु करण्याची शासनाने घाई करू नये. काही खासगी इंग्रजी शाळांमध्ये ५५ ते ६० विद्यार्थी एका एका वर्गात आहेत. त्यामुळे अशावेळी एखादा कोरोना पाॅझिटिव्ह झाल्यास जबाबदारी कोण घेणार. त्यामुळे वर्गातील विद्यार्थी संख्या निश्चित करून शाळा सुरू करणे योग्य राहील.
मनोज वासेकर
चंद्रपूर