लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शहरातील नागपूर रोडवरील वडगाव परिसरातील तीन दुकाने शनिवारच्या रात्री चोरट्यांनी फोडली. यामध्ये २ लाख १५ हजाराची रोख रक्कम पळविली. मेन रोडवरील दुकाने फोडल्याने व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
चंद्रपूर-नागपूर रोडवरील वडगाव परिसरामध्ये असलेले पवनसुत इंटरप्राईजेस, चांडक मेडिकल आणि जनार्धन एजन्सी या तिन्ही दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. याप्रकरणी पवनसुत इंटरप्राईजेसचे मालक अतुल कुचनकार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पवनसुत इंटरप्राईजेसच्या मागील बाजूचे शटर फोडले. नागपूर येथील व्यावसायिकांना देण्यासाठी त्यांनी रक्कम ठेवली होती. मात्र चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेली १ लाख ७० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती दिली. विशेष म्हणजे, शनिवारी रात्रीच याच परिसरातील रोहित सुधाकर माडुलवार यांच्या जनार्धन एजन्सीमध्येही चोरट्यांनी हात साफ केला.
यामध्ये ४५ हजार रुपये चोरून नेले. त्यानंतर बापटनगर चौकामध्ये असलेल्या चांडक मेडिकलचेही शटर तोडून ३५ हजार रुपये लंपास केले. यासंदर्भात पवनसुत इंटरप्राईजेसचे अतुल कुचनकार, चांडक मेडिकलचे मोहित चांडक, जनार्धन एजन्सीचे रोहित माडुरवार यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्यावसायिकांमध्ये भीती वातावरण चंद्रपूर-नागपूर मार्गावर सारखी वर्दळ असते. तिन्ही दुकाने याच मार्गावर आहे. मेन मार्ग असतानाही चोरट्यांनी चोरीचे धाडस केल्याने व्यावसयिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद शनिवारी एकाच रात्री तीन दुकाने फोडल्याची घटना दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामध्ये चोरटे अंगावर शाल ओढून असून तोंड बांधलेले आहे. विशेष म्हणजे, दुकानांतील इतर साहित्य न चोरता केवळ पैसे चोरून नेले आहे.