लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गुजरात राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीमार्गे बिलासपूर येथे चोर बिटी घेवून जाणारा ट्रक मूल कृषी विभागाने मंगळवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या मदतीने पकडला. यामध्ये २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे.देशात लॉकडाऊन आहे, असे असतानाही अत्यावश्यक सेवा सुरु आहे. हीच संधी साधत गुजरात राज्यातील सानंद येथून क्र. एमएच ३२ सीक्यु ९८८२ मधून विक्रीस बंदी असलेले चोर बिटी बियाणांची तस्करी होत असल्याची माहिती मूल येथील कृषी विभागाला मिळाली. तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, सहायक पोलीस निरीक्षक ठवरे यांच्यासह मंडळ अधिकारी दिपतांशु तिजरे, कृषी पर्यवेक्षक तथा मंडळ अधिकारी रविशंकर उईके यांनी बेंबाळ येथे गस्त सुरु केली. दरम्यान, सदर ट्रक मूल तालुक्यातील बेंबाळ येथे आल्यानंतर अडवून तपासणी करण्यात आली. यामध्ये राघवा तसेच मेघना कंपनीच्या प्रत्येकी १ हजार बॅग आणि अरूणोदया कंपनीच्या सुमारे दीड हजार चोर बिटीच्या बॅग आढळून आल्या. या बॅग जप्त करण्यात आल्या. चोरबिटीची किंमत २५ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे. आयसर कंपनीचा ट्रक ४ लाख रुपए असा एकूण २९ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी मूल तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर ट्रक चालक अब्दुल रिशीक रफीक शेख रा. नागपूर याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ४२० भादंवी, बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, कापूस बी बियाणे अधिनियम २००९, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.