राजू गेडाम
चंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला पोषक असणारी ज्वारीपासून बनविलेली आंबील ग्रामीण भागात प्रसिद्ध आहे. अंबील शरीराला पोषक असल्याने ग्रामीण भागात घरोघरी आंबील केली जाते. मात्र, ती शहरी भागात काही मोजक्या ठिकाणी बनविली जाते. मूल शहरातील नागरिकांनासुद्धा आंबीलचा स्वाद घेता यावा या उद्देशाने मूल येथील तांगडे कुटुंबीयांनी गेल्या सात वर्षांपासून आंबीलपोई सुरू करून नागरिकांची तृष्णा भागविण्याचे काम सुरू केले आहे.
यावर्षीसुद्धा आंबीलपोई सुरू करून उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा देत आहेत. उन्हाळा आला की थंड पाणी हवेहवेसे वाटते. काही वर्षांपूर्वी पाणपोई थाटून माठात थंड पाणी भरून दिले जायचे. मात्र, काळ बदलला तसा पाणपोईत बदल करीत माठाची जागा कॅनने घेतली. मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता पाणपोई आता सेल्फ सर्व्हिस झाल्या आहेत. मात्र, तांगडे कुटुंबीयांनी स्वतः पुढाकार घेत पाणीपोईत भर घालीत आंबीलपोई सुरू केली. दररोज ७०० ते ८०० व्यक्ती आंबीलचा लाभ घेत असून, सकाळी १०.३० वाजल्यापासून ही आंबीलपोई सुरू होते. कुटुंब प्रमुख रमेश तांगडे, पत्नी सुलोचना, मुले वैभव, रोहित व कुटुंबातील सर्व सदस्य या आंबीलपोईकडे लक्ष घालून नागरिकांना सेवा देत आहेत.