घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : दोन वर्षांपासून थकीत असलेली नरेगाची ७ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपयांची देयके राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडून नुकतीच पंचायत समितीला प्राप्त झाली. या देयकांमुळे १७ ग्रामपंचायतींची अडचण दूर झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील उश्नाळ मेंढा, वाढोणा, आकापूर, येनोली माल, सावरगाव, चारगाव चक, मेंढा, कन्हाळगाव, वलनी, पांजरेपार, जनकापूर, गंगासागर हेटी बॉड ग्रामपंचायतींनी नरेगांतर्गत विविध कामे केली होती; मात्र देयके रखडली होती. दिवाळीच्या तोंडावर आता ७ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपयांची ही देयके शासनाकडून रिलीज करण्यात आली. ग्रामपंचायतींनी दोन वर्षांपूर्वी नरेगांतर्गत गावातील रस्ते, पाणंद रस्ते, रस्त्यांचे खडीकरण ही कामे केली होती. मात्र शासन स्तरावरील अडचणींमुळे देयके अदा करण्यात येत नव्हती. त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागला. शासनस्तरावर प्रलंबित असलेली देयके अदा करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायतीकडून सतत पाठपुरावा सुरू होता. संबंधित विभागाकडे निवेदने व पत्रव्यवहार केल्यानंतर दाखल घेण्यात आली. अखेर राज्य शासनाने १३ ग्रामपंचायतींचे ७ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपये पंचायत समितीकडे रिलीज केले. पैसे आल्याचे कळताच संबंधितांची पंचायत समितीत चकरा मारणे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
काही ग्रामपंचायतींना प्रतीक्षाच
- नरेगाच्या कामाची देयके ग्रामपंचायतीच्या नावावर असली तरी या देयकांचे लाभार्थी वेगळेच आहेत. काही ठिकाणी दस्तुरखुद्द सरपंच हेच त्या कामाचे कंत्राटदार आहेत तर काही ठिकाणी सरपंचाच्या मर्जीतील लोकांचा समावेश आहे.
- सद्यःस्थितीत १३ ग्रामपंचायतींची ७ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपयांची देयके अदा झाली; पण अनेक ग्रामपंचायतींना अद्याप देयके प्राप्त झाली नाहीत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती देयकांच्या प्रतीक्षेत आहेत.