एपीएलएलचे दलाल मोकाटच : गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळगडचांदूर : स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अॅन्ड सर्व्हिस लिमिटेड आणि एपीएलएल या दोन कंपन्यांच्या दलालांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी संघटन करून दलालांविरोधात चार महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली. मात्र पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सदर दलालांनी शिक्षण देऊन आयटीची पदविका देण्याचे आश्वासन प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांना दिले होते. माात्र या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण न देता विद्यार्थ्यांचे वर्ष वाया घालविले आहे. आर्थिक व मानसिक शोषण केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. आरोपींची नावे व फोटो पोलिसांना प्राप्त झाले असून आरोपींच्या ठिकाणांचा पत्ताही माहित असताना अजूनही पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अॅन्ड सर्व्हिस लिमिटेड या नावाने आठ हजार ७९९ रुपयांचा डि.डी. काढून विद्यार्थ्यांना आय.टी. चा डिप्लोमा देण्यात येणार होता. म्हणून गडचांदूर, राजुरा, जिवती, कोरपना, नांदाफाटा, लखमापूर, पिंंपळगाव, हरदोना, मानोली, सोनुर्ली, नारंडा, लोणी, कळमना, चिंचोली, तळोधी, खिर्डी, कवठाळा व परिसरातील इतर गावातील विद्यार्थ्यांनी आय.टी. शिक्षणाचा डिप्लोमा मिळविण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र प्रवेशाच्यावेळी दिलेले एकही आश्वासन पूर्ण न करता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षसुद्धा वाया घालविले.सदर कंपनीचे दलाल अतुल कोहपरे, संजय निमगडे, सचिन मडावी, हेमंत कुळसंगे, अर्जून आलाम, समय्या पनेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांकडून डी.डी. काढून घेतल्यानंतर गडचांदूर येथील गौस सिद्दीकी यांच्या ब्लॉसम कॅम्प्यूटर इंन्स्टीट्यूटशी करार करून विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. सिद्दीकी यांना त्याचा मोबदला मिळणार होता. मात्र काही दिवस मोबदला देऊन कंपनीने सिद्दीकीला मोबदला देणे बंद केल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देणे बंद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे.कंपनीने विद्यार्थ्यांना आय.टी. पदविकेचे महत्त्व पटवून सांगितले. ७० टक्कपेक्षा जास्त गुण घेतल्यास मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कंपनीकडूनच रोजगार मिळवून देण्यात येणार असे सांगण्यात आले होते. शिक्षण देणे बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारंवार कंपनीच्या एजेंट लोकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते ‘तुमच्याने जे होते ते करून घ्या’ म्हणून उडवाउडवीची उत्तरे देत होते. दोन वर्ष गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना कंपनीकडून साधा फोन सुद्धा आला नाही. तसेच काही मुलांकडून परस्पर पैसे घेऊन त्यांचा डी.डी. न काढता पैसे हडपण्यात आले. एवढेच नाही तर डीडी काढणाऱ्या अनेक मुलांचे एपीएलएलच्या यादीत नावही नसल्याचे समजते.कंपनीने विद्यार्थ्यांची झालेली शैक्षणिक व आर्थिक नुकसान भरपाई करून द्यावी व भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळू नये म्हणून विद्यार्थ्यांकडे आलेल्या दलालांवर कारवाई व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र अजूूनपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही हा प्रश्न तक्रारकर्त्यां विद्यार्थ्यांना पडला आहे. (शहर प्रतिनिधी)
‘त्या’ आरोपींना पोलिसांचे अभय
By admin | Published: July 21, 2014 11:45 PM