फोटो
घुग्घुस : येथील आमराईसह इतर वॉर्डात मागील ३५ वर्षांपासून नजूलच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना तहसीलदारांनी नोटीस बजावून सुनावण्यासाठी कार्यालयात हजर राहण्याची तंबी दिल्याने अतिक्रमणधारकांत भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या नागरिकांना स्थायी पट्टे देण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
बुधवारी शहर काँग्रेसचे राजू रेड्डी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे व अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन सादर केले. आमराई परिसरातील नजूलच्या जागेवर सुमारे ३०० नागरिक मागील ३५ वर्षांपासून घरे बांधून वास्तव्य करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी ११८ लोकांना तहसीलदारांनी नोटीस पाठवून १ मार्चला तहसील कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याची मुभा दिल्याने आपल्यावर बेघर होण्याची वेळ तर येणार नाही, अशी भीती निर्माण झाली. सदर गंभीर बाबीची दखल घेऊन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन स्थायी घरपट्टे देण्याची तथा दंडासाठी त्रास देऊ नये, अशी विनंती केली आहे.