पेपर मिल उद्योग : स्थायी, अस्थायी कामगारांचा समावेश ब्रह्मपुरी : हरदोली येथील गौरव पेपर मिल २४ जूनपासून व्यवस्थापकाने बंद पाडली. त्यामुळे येथील नियमित ९५ व अस्थायी ७५ कामगारांनी पेपर मिल समोर साखळी उपोषणाला मंगळवारपासून सुरूवात केली आहे. तालुक्यातील एकमेव उद्योग असलेला गौरव पेपर मिल उद्योग गेल्या ३० वर्षापासून सुरू होता. वेळोवेळी व्यवस्थापनाने अनेक कारणे दाखवून कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते देण्याचे टाळल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. व्यवस्थापनाने कंपनी तोट्यात असल्याचे सांगून उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला. शेवटी २४ जूनपासून उद्योग बंद करण्यात आला. परंतु कंपनीचे उत्पादन व मागणीही मोठी आहे. अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी लागणाऱ्या पेपरची मागणी वाढत गेली होती. परंतु, हा मिल बिमार उद्योग म्हणून नाकारला गेल्याने मिळणारे सरकारी फायदे मिळणार नसल्याने व्यवस्थापनाने पेपर मिल बंद करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कर्मचारी वर्ग भरडल्या जात आहे. व्यवस्थापनाने आपल्या फायद्यासाठी कर्मचाऱ्यांवर सुड उगवण्याचा हा प्रकार सुरू केला असल्याने ९५ नियमित व ७५ अनियमित कामगारांच्या उदरनिर्वाहाराचा, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न उभा आहे. जिल्ह्यात १२ वीत प्रथम आलेली नेहा सिंगचे वडील सुभाष सिंग हे सुद्धा या पेपर मिलमध्ये काम करीत होते. त्यांनाही अशा हुशार मुलीला शिकविण्याचा प्रश्न उभा आहे. अशा अनेक समस्या कर्मचाऱ्यांना भेडसावत असल्याने व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी द्यावी, उरलेल्या सेवेचा मोबदला द्यावा आदी मागण्यांसाठी मंगळवारपासून पेपर मिल समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. लोकप्रतिनिधी व संबधीत विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू
By admin | Published: July 09, 2015 12:56 AM