दीपक साबनेलोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तेलंगणा सीमेलगत असलेल्या येल्लापूर ग्रा.पं.अंतर्गत येत असलेली येल्लापूर, येल्लापूर (खु.), गोंडगुडा, कोलामगुडा ही चार गावे ग्रा.पं.प्रशासनाच्या हेतुपरस्सर दुर्लक्षामुळे समस्यांच्या विळख्यात अडकली आहेत. गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
येल्लापूर येथील पंचशील बुद्ध विहार ते बाबासाहेब जोंधळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला असून बुद्ध विहाराजवळ चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तलावाखालील विहिरीकडे जाणारा रस्ता, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, येल्लापूर (खु.) येथील हातपंपाजवळून शाळेकडे जाणारा रस्ता या सर्वांची पावसाळ्याच्या दिवसांत हीच अवस्था आहे. येल्लापूर, येल्लापूर (खु.) येथील हातपंपाचे पाणी सांडपाणी व्यवस्थापनाअभावी रस्त्यावर पसरून घाण निर्माण झाली आहे. गावातील गवतही कापण्यात आले नसून गावातील नाली सफाई देखील करण्यात आली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जि.प. शाळेजवळील विहीर कोसळून दोन वर्षांच्या वर कालावधी लोटूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. या विहिरीतील पाण्याचा वापर गावकरी करतात. दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षांपूर्वीपासून जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेला पाणीपुरवठा बंद असून जलजीवन मिशनचे कामही अर्धवट आहे. तरी ग्रा.पं. मार्फत विशेष पाणी कराच्या नोटिसा बजावण्यात आल्यात. जि.प. शाळेच्या तीन इमारती, अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याच इमारतीत अद्यापही चिमुकले धडे गिरवत आहेत. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. मुलींसाठी शौचालय देखील नाही. संरक्षण भिंत नाही, रंगरंगोटी देखील करण्यात आली नाही. गावात अपवादात्मक ठिकाणे वगळता पथदिवे नाहीत.
यासह अनेक समस्यांचे निवेदन येल्लापूर येथील ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष यासह १०३ नागरिकांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. ग्रामसेविका हप्त्यातून एक ते दोन दिवसच ग्रा.पं.ला येतात. गावातील समस्यांविषयी विचारणा करायला गेलेल्या नागरिकांना तुमचं गावच खूप खराब आहे, येथे कोणी काम करायला येत नाही, तुम्हाला काय समजते, अर्थ उद्धटपणाने उडवाउडवीची उत्तरे देतात तसेच सरपंच व उपसरपंच यांच्य नातेवाइकांचा कामाच्या कमिशनच्या लोभापायी ग्रामसेविका यांन ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप वाढविला आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली आहे.
विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामेमागील तीन वर्षापासून विकासकामांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. त्या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई देखील करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. गावातील समस्या दूर नाही झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.