लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्पांतर्गत नाबार्ड साहाय्यातून राज्यातील ६० प्रकल्पांमध्ये पकडीगड्डूम मध्यम सिंचन प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ८८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रकल्पातील १७ ते १८ गावांपैकी दहा गावे तीन दशकांपासून सिंचन सुविधांपासून वंचित आहेत.
पकडीगड्डूम जलाशय ते इंजापूरपर्यंत मुख्य कालवा आहे. डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून वाया जात आहे. या प्रकल्पांतर्गत ३२०० हेक्टर सिंचन क्षमता प्रस्तावित असली तरी प्रत्यक्षात गेल्या ३० वर्षांत फक्त १००० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरच सिंचन करता आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचलेलेच नाही.
गेल्या ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या कालव्यांमधील अनेक लघु कालवे आणि नाल्याजवळील शेतकऱ्यांनी शेतात लागवड केल्यामुळे ते नासधूस झाले आहेत. डोंगरी आणि चढ-उतार असलेल्या भागांमध्ये पाणी पोहोचविणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. अंबुजा सिमेंट प्रकल्पाला पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, कंपनीच्या खदानीमध्ये पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनीला पाणी न देता शेतकऱ्यांच्या बांधावर पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
मार्च २०२४ मध्ये सिंचन क्षमतेसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा सदुपयोग करून शेतकऱ्यांना बांधावर पाणी पोहोचवण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित करून प्रकल्प आराखडा तयार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी केली आहे.