आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगेबाबांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कार्य केले. समाजात चांगला माणूस घडावा, त्यातून एकोपा निर्माण व्हावा, माणसा-माणसामधील अज्ञान दूर करण्यासाठी व समाजाला जागृत करण्यासाठी त्याग केला. त्यांचे कार्य आघाडीलाही विचाराने जिवंत आहे. राष्ट्रसंताचे कार्य देश घडविणारे असून प्रासंगीक स्वरूपात त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत, असे विचार माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.बल्लारपूर तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव स्थानिक हनुमान मंदिर विवेकानंद वॉर्ड येथील प्रांगणात पार पडला. यावेळी कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शक म्हणून अॅड. चटप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे सभापती अरुण वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजूरा तालुका सेवाधिकारी अॅड. राजेंद्र जेनेकर, नगरसेवक महेंद्र ढोके, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, बल्लारपूर तालुका सेवाधिकारी भास्कर डांगे, जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, गंगाराम धोटे, सारिका जेनेकर, महिला प्रमुख अरुणा डांगे, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक तुळशिराम गोरे, परशुराम सातपुते, केशव सातपुते, श्रीराम वऱ्हाडे, नागोराव कामटकर यांची उपस्थिती होती.तत्पूर्वी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध भजन मंडळाच्या सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्रासह मुख्य मार्गाने पालखी मिरवणूक काढून संताच्या विचारांचा संदेश दिला. शेकडोवर गुरुदेव भक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.दरम्यान ठाणेदार प्रदीप सिरस्कर, अॅड. राजेंद्र जेनेकर, अरुणा डांगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्ता संमेलनाचे संचालन प्रा. श्रावण बानासुरे यांनी केले तर आभार तालुका सेवाधिकारी भास्कर डांगे यांनी मानले. यावेळी गुरुदेव भक्तासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राष्ट्रसंतांचे विचार प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:35 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगेबाबांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कार्य केले.
ठळक मुद्देवामनराव चटप : बल्लारपुरात तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव