शाळा सुरू झाली नाही. त्यामुळे शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते तत्काळ काढण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, कोरोना काळात पालकांना खाते काढायला बऱ्याच अडचणी येत आहेत. एवढेच नाही तर पालकांना बॅंक खाते काढण्यासाठी हजार रुपयांच्यावर खर्च येत आहे. ग्रामीण भागात बॅंक नाही. अशावेळी पालकांना शहरात यावे लागत आहे. यामध्येही कोरोनाचे संकट कायम आहे. सध्या शेतीची कामे आहेत. त्यामुळे रोजगार बुडवून बॅंक खाते काढण्यासाठी यावे लागत आहे.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी खाते यापूर्वीच काढले आहे. बँकांनी या खात्यात बॅलन्स न ठेवल्यामुळे दंड वसूल करणे, पासबुक न देणे, खाते बंद करणे अशी सक्ती केली आहे. राज्यभरात अनेक विद्यार्थी बँक खात्याविना आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही तर काहींचे आधार चुकीचे असल्याने ते लिंक नाही. सध्या कोरोनाकाळात खेड्यापाड्यातील पालकांना शहरात येऊन खाते काढणे अडचणीचे तसेच खर्चीक आहे.
बाॅक्स
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली-२८८२४
दुसरी-३१२७२
तिसरी-३१७८४
चौथी-३३७१९
पाचवी-३२८४५
सहावी-३२३५७
सातवी-३३१६१
आठवी-३३४४१
बाॅक्स
बॅंक खाते उघडण्यास लागणार हजार रुपये
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे बॅंक खाते नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बॅंक खाते काढण्यासाठी शहरात यावे लागणार आहे. यासाठी पालकांसोबत येण्या-जाण्याचा खर्च लागणार आहे.
सध्या ग्रामीण भागामध्ये शेतीची कामे जोरात सुरू आहेत. अशावेळी एक एक दिवस शेतकऱ्यांसह शेतमजुरांना महत्त्वाचा आहे. त्यामुळे मजुरी तसेच काम बुडवून बॅंकेत जावे लागणार असल्याने यामध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
बॅंकेत पासबुक काढण्यासाठी काही रक्कम जमा करावी लागते. कोणतीही बॅंक शून्य बॅलन्सवर खाते उघडून देणार नाही. त्यामुळे नवीन बॅंक खाते उघडण्यासाठी किमान ५०० रुपये भरावे लागणार आहेत. असा पूर्ण विचार केल्यास एक ते दीड हजार रुपये पालकांचा खर्च होणार आहे.
कोट
शालेय पोषण आहार वितरण डीबीटी योजनेसाठी विद्यार्थी बॅंक खात्याचा अट्टाहास करू नये. यात अनेक अडचणी आहेत. तसेच ही योजना कायमस्वरूपी नाही. नाहीतरी पालकच रक्कम काढून आहार देणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर आहार मिळावा असे वाटत असेल तर पालकांच्या खात्यात रक्कम पाठवणे योग्य ठरेल.
- हरीश ससनकर
राज्य सरचिटणीस
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना
कोट
माझी दोन मुले शाळेत जातात. या योजनेसाठी दोघांचेही खाते मला काढावे लागेल. त्यासाठी डबल खर्च येईल. जेवढे पैसे मिळतील त्यापेक्षा जास्त पैसे खाते काढण्यासाठी लागतील. त्यापेक्षा पालकांच्या खात्यात निधी पाठविल्यास सोयीस्कर होईल.
-सचिन मडावी
पालक, चिंतलधाबा
कोट
पेरणीचा हंगाम सोडून, रोजी सोडून तसेच कोरोनाच्या काळात बॅंकेच्या गर्दीत मुलांना तालुक्यावर खाते काढायला घेऊन जाणे आजच्या घडीला शक्य नाही. त्यामुळे पालकांच्या खात्यातच पोषण आहाराचे पैसा जमा करणे योग्य राहील.
-भारत कुळमेथे
पालक, थेरगाव