सिंदेवाही : कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र पसरली आहे. यातून दररोज नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. अनेकजण मृत्यूमुखीही पडत आहेत. त्यामुळे नागरिकांचा लसीकरणाकडे कल वाढला आहे. या परिस्थितीत तालुक्याला पाहिजे त्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील हजारो नागरिक अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत.
आता तर १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्याचा सूचना सरकारने दिल्या आहेत. मात्र, पूर्वीच्याच ४५ वर्षांवरील नागरिकांना उद्दिष्टाच्या ३० टक्के लसीकरण झाले आहे. पहिल्याच टप्प्यातील ७० टक्के लसीकरण बाकी आहे. अशा परिस्थितीत इतर नागरिकांचा अतिरिक्त भार लसीकरण मोहिमेवर वाढणार नाही का, असा प्रश्न आहे. लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असली, तरी त्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने १ मेपासून विदारक चित्र पुढे येण्याची शक्यता आहे. हजारो नागरिक अजूनही लसीची वाट पाहत आहेत. आरोग्य विभागाने लसीचा पुरवठा लवकरात लवकर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.