प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांचा कापूस हमी भावाने कापूस पणन महासंघाने ३० जूनपर्यंत खरेदी केला. त्यानंतर शेतीचा हंगाम सुरु होवून पिके फुलावर आले असताना दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना विकलेल्या कापसाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे.
मागील हंगामात पणन महासंघाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर, भिसी व गोंडपिपरी येथे हमी भावाने कापूस खरेदी केंद्र सुरु केले. हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली, त्याच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. हमीभाव कापूस खरेदी केंद्राकरिता जिनिंग सापडत नव्हत्या. पणन महासंघाकडे अपुरा कर्मचारी वर्ग, अशा स्थितीमध्ये हमीभावाने कापूस खरेदीची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर कापूस व गाठी ठेवण्याकरिता जागा नसणे, अकाली पावसाने हजारो क्विंटल कापूस भिजणे, अशा कारणामुळे मागील हंगामात अनेक दिवस कापूस खरेदीमध्ये अनियमिता आली. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता कापूस खरेदी कित्येक दिवस बंद राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल कापूस शिल्लक असल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते.
काही कालवधीनंतर कापूस खरेदी सुरु करीत ८ जून ते ३० जूनपर्यंत कापूस खरेदी करण्यात आला. त्यात वरोरा ८७९, चिमूर, भिसी ४०० तर गोंडपिपरी केंद्रावर २५० अशा एकूण १५२० शेतकऱ्यांनी कापसाची हमीभावाने विक्री केली. आज जवळपास दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस विक्रीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे हे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने दिवसागणिक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यांना आर्थिक संकटातून सोडविण्याकरिता पणन महासंघाने विकलेल्या कापसाची रक्कम त्वरित बँक खात्यात जमा करावी.- राजेंद्र चिकटे, सभापती बाजार समिती वरोरा.