अध्यादेशाला उशीर : कापूस बियाणाच्या पॉकेटवर १०० रुपयांची सूटवरोरा : या हंगामात मॉन्सून वेळेवर पोहचण्याचे भाकीत हंगामाच्या दोन ते तीन महिन्यांपूर्वीच करण्यात आल्याने पेरणीच्यावेळी बियाणाची टंचाई भासू नये, यासाठी शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी केली. त्यानंतर शासनाने ९ जूनपासून ज्या शेतकऱ्यांनी कापूस बियाणे घेतले, त्यांना प्रती पॉकेट १०० रुपयांची सुट दिली. ९ जूनपूर्वी जवळपास ४० टक्के शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी केली. त्यांना या लाभापासून आता वंचित रहावे लागणार आहे. तुर्तास शंभर रुपयांची सुट मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.दरवर्षीच हंगामात कापसासह अन्य बियाणांचा काळाबाजार होत असतो. त्यामुळे पेरणीच्यावेळी पाहिजे असलेले वाण घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. प्रसंगी अधिक दराने बियाणे घ्यावे लागते. असा अनुभव शेतकऱ्यांना असल्यामुळे ४० टक्के शेतकरी हंगामाच्या एक महिन्यापूर्वीच कापूस, सोयाबीन बियाणांची खरेदी करीत असतात. यावषीसुद्धा शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यांपूर्वीच कापूस बियाणांची खरेदी करून घेतली. हंगामापूर्वी कापूस बियाणांची खरेदी केल्यामुळे आवश्यक असलेले बियाणे मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी आनंदी झाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने कापूस बियाणांच्या प्रत्येक पॉकेटमागे १०० रुपये सुट जाहीर केली. १०० रुपये सुट ही प्रत्येक कापूस बियाणे कंपनीने देणे बंधनकारक केले. त्याचा अध्यादेश ९ जून रोजी पोहचला. ९ जूनपासून कापूस बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून प्रत्येक पॉकेट मागे सुट दिली जात आहे. ८ जूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कापूस बियाणे घेतले, त्या शेतकऱ्यांना सुट नाकारली. त्यामुळे या हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ९ जूनपूर्वी कापूस बियाणे घेतले. ज्यांच्याकडे बियाणे घेतल्याची पावती आहे. अशा शेतकऱ्यांना शंभर रुपयांची सुट देण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
९ जूनपूर्वी बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांना हजारोंचा फटका
By admin | Published: July 15, 2015 1:11 AM