पोंभूर्णा : तालुक्यामध्ये धान पिकाचे पऱ्हे टाकण्याची कामे आटोपली आहेत. तसेच कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा करण्यात आली. परंतु तब्बल एक महिना लोटूनसुद्धा पावसाने दडी मारल्याने धानपिकाचे पऱ्हे व सोयाबीन पाण्याअभावी करपू लागले असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागील एक महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही, तर दुसरीकडे गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी व्यूहरचना आखताना दिसत आहेत. तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी सुविधा नसल्याने दरवर्षीच अशा संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार सुरूवात केली आणि तब्बल तीन ते चार दिवस सतत पाऊस पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धान पिकाचे पऱ्हे टाकणीला सुरूवात केली. अनेकांनी कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा आटोपून घेतली. पावसाची दमदार सुरूवात बघून अनेकांनी रासायनिक खतासोबतच पेरणी केल्याचे समजते. जमीन ओलसर असल्याने व खताची मात्रा दिल्याने धानपिकाचे पऱ्हे व सोयाबीन जोमात आले. परंतु त्यानंतर एक महिना लोटूनसुद्धा पाऊस न पडल्याने आणि उन्हाचा उकाडा वाढल्याने जोमात आलेले धान पिकाचे पऱ्हे व सोयाबीन आता सुकायला लागली आहे. तर अनेकांच्या शेतातील धान पिकांचे पऱ्हे सुकून त्याचे तणसात रूपांतर झाले आहे. कृषी केंद्रातील महागडी बिजाई खरेदी करून शेतकऱ्यांनी शेतामध्ये टाकली. त्याची उगवण शक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे झाली. शेतकरी आनंदात होता. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्राने पुन्हा शेतकऱ्यावर घात केला असुन पाण्याअभावी धान पऱ्हे नाहीसे झाल्याने शेतात रोवणी कशी करायची, बिजाई कुठून आणायची असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. ज्यांच्या शेतामध्ये विंधन विहीरी आहेत त्यांनी आपल्या धान पऱ्हयाला मोटार व इंधन द्वारे पाणी देऊन वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अशा पद्धतीने पिक वाचवायचे तरी किती दिवस असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागील वर्षीसुद्धा या तालुक्यामध्ये धानपीक अगदी शेवटच्या टोकावर असताना पावसाने अचानक दडी मारली. परिणामी शेतकऱ्यांचे हातचे पिक नाहीसे झाले. त्याची धग अजुनही कायम असताना यावर्षी मात्र रोवणीच्या पूर्वीच पऱ्हे करपून नाहीसे होत असल्याने पुढे करायचे काय? असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला असुन लोकप्रतिनिधी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या व्यूहरचनेत तल्लीने झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
हजारो हेक्टरमधील धान पऱ्हे धोक्यात
By admin | Published: July 10, 2015 1:34 AM