लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी आयुध निर्माणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनातून केली. दरम्यान, याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आश्वासन अहीर यांनी शिष्टमंडळाला दिले.आयुध निर्माणी चांदा येथील कार्यरत भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची भेट घेऊन निवेदन दिले. आयुध निर्माणी चांदा येथील कर्मचारी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. संरक्षण विभागाच्या या महत्त्वपूर्ण संस्थेचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. कामगार आणि शासनामध्ये मतभेद निर्माण होऊन टोकाचा वाद वाढू शकतो.त्यामुळे देश आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देऊन यासंदर्भात केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याची विनंतीही भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. याशिवाय कामगारांच्या अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली.यावेळी आ. नाना श्यामकुळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार आदींची उपस्थिती होती. निवेदन देताना शिष्टमंडळात सदानंद गुप्ता, एस. पी. बिडवाईक, प्रकाश गरपल्लीवार, जितु नाईक, दीपक शर्मा आदींचा समावेश होता.
आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास हजारो कामगारांचे होणार नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:29 AM