पोंभुर्णा: येथील पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेल्या महिला ठाणेदार निर्मला किन्नाके यांची गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू आहे. त्यांच्या मोहिमेमुळे दारू विक्रेत्यांसोबत पिणाऱ्यांमध्येसुद्धा धास्ती पसरली आहे.पोंभुर्णा शहरात काही दिवसांपूर्वी महिला ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली. ही बाब चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. या पूर्वी त्या चंद्रपूर येथील रामनगर ठाण्यात कार्यरत होत्या. कायदा व सुव्यवस्था उत्तमरितीने हाताळत काही दिवसातच त्यांनी महिलांचे मने जिंकली. तसेच येथील व्यापारी बांधवांना सूचना करुन रात्री १० वाजता दुकाने, पानठेले बंद करण्यास भाग पाडले. यापूर्वी काही पाठनेले उशिरापर्यंत राहत असल्यामुळे अवैध दारूविक्रीस काही प्रमाणात प्रोत्साहन मिळत होते. आता रात्री १० वाजताच श्हरातील दुकाने, पानटपरी बंद होत असल्याने मुख्य रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण कमी झाले असून, लोकांची रेलचेल दिसून येत नाही, गावातील मुख्य चौकात तरुणवर्ग गप्पा मारत दिसायचे. त्यांनासुद्धा तंबी दिली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्रीवर आळा बसला आहे. दारू विक्रेत्यासोबत दारू प्राशन करुन रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवरही कारवाई करण्याच्या भीतीने मद्यप्राशन करुन गोंधळ करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. याशिवाय गावागावात दारूबंदी महिला समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित महिलांच्या बैठका घेण्याचा धडाका सुरु केला आहे. ही कामे अपुऱ्या मनुष्यबळावर करावी लागत असल्यामुळे त्यांची तारेवरची कसरत होत आहे. येथे ४२ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ १५ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनुष्यबळ पुरवण्याची गरज आहे. ठाणेदारपदी महिलेची नियुक्ती करण्यात आल्याने तालुक्यातील महिलांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध दारू विक्रीच्या विरोधात तालुक्यातील महिलाही सरसावल्या असून ठाणेदाराच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
ठाणेदारांच्या धडक मोहिमेमुळे दारूविक्रेत्यांमध्ये धास्ती !
By admin | Published: May 23, 2016 1:00 AM