पोलिसात तक्रार : अवैध रेती तस्करीचा प्रकारवरोरा : सध्या वरोरा तालुक्यात रेती तस्करी वाढली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रेती वाहतूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला मारहान व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ८ जूनला दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुळणा या गावात घडला.तुळणा येथील विकास गोविंदा ताजणे हा अल्पभूधारक शेतकऱ्याकडे तुळाना शेतशिवारात वर्धा नदीला लागून ७.९० आर ओलीताची शेती आहे. त्यावर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र रेतीचे ट्रक्टर हे विकास ताजणे यांच्या शेतातून जातात. त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी वर्धा नदीवर कृषी पंप लावला आहे. त्याकरिता शेतकऱ्याने शेतातून नदीपर्यंत केबल, पाईपलाईन टाकली आहे. मात्र अवैध रेती तस्करी करणारे काही ट्रक्टर मालक हे त्यांच्या शेतातून ट्रॅक्टर नेत असल्यामुळे केबल व प्लॉस्टिकच्या पाईपचे नुकसान झाले. त्याकरिता नुकसान भरपाई देण्याची मागणी विकास ताजणे व त्यांचा पुतण्या प्रविण धनराज ताजने यांनी ट्रक्टर थांबवून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. याचवेळी ट्रॅक्टर मालक भीमराव ठेंगणे हे घटनास्थळी येवून ‘तू भरपाई मागणारा कोण’ असे म्हणत प्रविण ताजणे याला मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. शेतकऱ्याने या प्रकरणाची तक्रार वरोरा पोलीस पोलिसात दाखल केली असून ट्रॅक्टर मालकाविरुद्ध भादंवि कलम ३९३, ४२६, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
रेती वाहतुकदाराकडून शेतकऱ्यास मारहाण व जीवे मारण्याची धमकी
By admin | Published: June 11, 2016 12:58 AM