चंद्रपूर : गुरुवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले. या अपघातात तिघांचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना सावली तालुक्यात घडली.
पहिल्या घटनेत गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील दाम्पत्य महाकालीचे दर्शन घेऊन दुचाकीने परत येत असताना खेडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात अभियंता असलेला पती प्रमोद जयपुरकर (३०) यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी प्रणाली जयपुरकर (२२) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दुसरा अपघात तालुक्यातील मोखाळा येथे घडला. यात ट्रॅक्टरला धडक दिल्याने यश हरी सहारे (१७) रा. मिंडाळा ता. नागभीड, जयेश महाडोळे (२६) रा. चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश विनायक मोहुर्ले (२७) रा. मिंडाळा हा जखमी झाला आहे. दरम्यान तिसऱ्या घटनेत किसाननगर येथे झालेल्या अपघातात सेजल गंगवाणी (२५) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी व्याहाड खुर्द येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होते. विदर्भातून अनेक प्रेक्षक आले होते. हा कार्यक्रम आटोपून परत जात असताना अपघात घडल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर करीत आहेत.
दुचाकीची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू
दोन दुचाकीची सामोरासामोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना सावली तालुक्यातील घोडेवाही फाटा येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. यात दिशांत हर्षद बोरकर (२५) याचा नागपूरला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला आहे. तर दुसरा दुचाकीचालक गंभीर असून त्याच्यावर गडचिरोली रुग्णालयात उपचार सुरु आहे.